Nigdi News : जलशुद्धीकरण केंद्रात साफसफाई करताना पाईपमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा तीन आणि चारच्या टँकमधील गाळ काढताना पाईपमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्याने आणि पाच तास पाईपमध्ये अडकल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

अजित सिंग (वय अंदाजे 23) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.महापालिकेचे सेक्टर 23 निगडी येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे.महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे.एजन्सीच्या माध्यमातून हे काम चालते.एजन्सीचे कामगार जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा तीन आणि चारच्या टँकमधील गाळ काढण्याचे आज सकाळी काम करत होते. शुद्धीकरण करुन पाणी पुढे पाठविले जात होते.

गाळ काढत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे अजित सिंग पाईपकडे ओढला गेला. त्यात तो अडकला. अजित ‘ट्रेस’ होत नसल्याचे त्याच्यासोबतच्या कामगारांनी सांगितले. त्यानंतर टप्पा तीन, चारचे पाणी तातडीने बंद केले.संपमधले पाणी काढले. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, पाणी कमी झाल्यानंतर अजित याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे दिसून आले.अजित याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अग्निशामक विभागाच्या जवानांनी अजितचा मृतदेह बाहेर काढला.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते.पावसाळ्यात जास्त गाळ येतो.टप्पा तीन, चारचा गाळ काढण्याचे काम आज सुरु होते.गाळ काढताना अचानक काही झाले हे कळले नाही.अजितसिंग हा कामगार ट्रेस होत नसल्याचे त्याच्यासोबतच्या कामगारांनी सांगितले. त्यानंतर पाणी बंद केले.संपमधले पाणी काढले. पाणी कमी झाल्यानंतर अजित पाईपमध्ये अडकल्याचे दिसून आले. त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढला आहे. जलशुद्धीकरणातील काम करणारी एजन्सी अनुभवी आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.