Hindu Janajagruti Samiti : नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान राखावा; हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

एमपीसी न्यूज –  यंदा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली म्हणून केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. यात 13 ते 15 ऑगस्ट  या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. मात्र हे करतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचीही दक्षता सर्व राष्ट्रप्रेमींनी घ्यावी, असे आवाहन हिंदु जनजागृतीच्यावतीने करण्यात आले आहे. यासंबंधी निवेदन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या ‘मास्क’ची विक्री होत आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. त्याचप्रमाणे कपड्यांवर, शरीरावर तिरंगा काढणे हा सुद्धा तिरंग्याचा अवमानच आहे. समितीकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा’ या आशयाचे निवेदन प्रशासन, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी देण्यात आले. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. यामध्ये हिंदु जनजागृती समिती यथाशक्ती योगदान देऊन याविषयावर जागृती करण्यासाठी आपल्याला साहाय्य करेल, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असेल, वा राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्यास दोषींवर कारवाई करावी, अशा प्रकारच्या मागण्याही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू, असे आश्वासन दिले. तसेच आतापर्यंत 23 हून अधिक शाळा,  महाविद्यालयात निवेदने दिली आहेत. सर्वांनी योग्य ती काळजी घेऊ असे सांगितले, वर्गात माहिती देण्यास विनंती केली.

या संदर्भात हिंदु जनजागृती समिती गेल्या 19 वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा  हा उपक्रम राबवते. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके, फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनीचित्रफित दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, ‘सोशल मीडीया’ द्वारे जनजागृती करणे आदी कृती केल्या जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.