World Cup 2023 : श्रीलंकेवर तब्बल 302 धावांनी मात करीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत शानदार प्रवेश

एमपीसी न्यूज :  (विवेक कुलकर्णी) विश्व कप स्पर्धेत श्रीलंका संघावर सर्वात (World Cup 2023) मोठा म्हणजेच 302 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपले उपांत्य फेरीतले स्थान पक्के करत अगणित क्रिकेट रसिकांना आनंदाच्या डोहात भारतीय संघाने डुंबवले आहे.

मुंबईच्या वानखडे मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतरही हंगामी लंकन कर्णधार मेंडीसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या घेतलेल्या अनाकलनीय निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय संघाने विक्रमी 300 हून अधिक धावांचा डोंगर रचत आणखी एका विजयाकडे दमदार पाऊल टाकले होतेच,आधी फलंदाजी करत भारतीय संघाने रचलेल्य या विशाल धावसंख्येमुळे भारताने श्रीलंका संघापुढे 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते ज्यास उत्तर देताना श्रीलंकन संघाची पुरती त्रेधातिरपीट उडाली आणि त्यापायीच त्यांना एका अतिशय मोठ्या आणि मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली.जबरदस्त फॉर्मात असलेल्या कर्णधार रोहितला डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतावे लागले पण या धक्क्यातून सावरत गील आणि कोहलीने केलेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारतीय संघाने सामन्यात शानदार पुनरागमन केले.दोघेही तुफानी पण अतिशय आकर्षक अंदाजात खेळत होते.

त्यांच्या अनेक फटक्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.विक्रमवीर कोहली आज एक हजार धावा एका वर्षात पुन्हा एकदा पूर्ण करून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीला साथ देता देता कधी गीलने टॉप गीयर टाकला हे कळण्याआधीच त्याने विश्वकप स्पर्धेतला आपला सर्वोच्च स्कोअर केला.

दुसऱ्या बाजूने कोहलीही शानदार अंदाजात खेळत होता, दोघेही शतकाजवळ आले होते आणि ते शतके पूर्ण करतीलच असे (World Cup 2023) वाटत असतानाच दोघेही तीन आकडी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरले नाही. गील 92,तर कोहली 88 वर बाद झाले, पण तोवर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची विशाल भागीदारी रचली होती, पण या दोघांच्या विकेट्सनतंर अचानक भारतीय संघ सुस्थितीत असताना अडचणीत आलाय असे वाटायला लागले होते.

त्यातच के एल राहूल,सुर्यकुमारही स्वस्तात बाद झाले, पण थँक्स 2 श्रेयस अय्यर,मागील सामन्यात खराब फटका मारून चौफेरटीकेला सामोरे जावे लागलेल्या श्रेयसने आज जबरदस्त मनोनिग्रहाचे शानदार प्रदर्शन करत एक अप्रतिम खेळी करुन भारतीय संघाला 300च्या पुढे आणून ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

भारतीय डावातली दोन शतके हुकल्यानंतर किमान श्रेयस तरी आपले वैयक्तिक शतक आपल्या घरच्या मैदानावर पुर्ण करील असे वाटत असतानाच तो ही 82 धावांवर असताना संघहीत डोळ्यासमोर ठेवून खेळत असल्याने वैयक्तिक विक्रम पुर्ण करू शकला नाही, पण श्रेयस एक अप्रतिम खेळी करुनच बाद झाला हे नक्की.

भारतीय संघाने 2019 नंतर 18 वेळा 300 वा त्याहून अधिक धावा काढण्यात यशस्वी ठरला आहे.अशी कामगिरी करणारा भारत (World Cup 2023) हा जगातला पहिला आणि एकमेव संघ आहे.या पराक्रमामुळेच भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 357 धावा ठोकल्या.

या विशाल धावसंख्येकडे बघता भारतीय संघ आपल्या सलग सातव्या विजयाकडे अग्रेसर होत आहे हे जवळपास सिध्द झालेच होते फक्त त्याची औपचारिकता बाकी होती असे कुणी आधी म्हटले असते तर त्याची कोणीही टर उडवली असती ,कारण क्रिकेट खेळाची असलेली अनिश्चितता.क्रिकेटमधे कधीही काहीही होवू शकते असे म्हटले जाते, यामुळेच कदाचित श्रीलंका संघ काही चमत्कार करेल का अशी अपेक्षा काही कट्टर चाहत्यांना होती, पण कसले काय नी कसले काय.

उत्तरादाखल खेळताना श्रीलंका संघाची अवस्था अतिशय खराब झाली.त्यांच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने पथुन निसंकाला पायचीत करुन पुढे काय वाढून ठेवले आहे याची जणू नांदीच दिली, त्यानंतर या स्पर्धेत आतापर्यंत तरी विशेष कामगिरी न करु शकलेल्या सिराजने आज शानदार कामगिरी करत आपल्या पहिल्या 7 चेंडूत तीन गडी बाद करत श्रीलंका संघाची अवस्था 4 बाद 3 अशी बिकट करून टाकली.

यानंतर लंकन संघाकडून फारसा प्रतिकार होणार नाही असे वाटले होतेच आणि तसेच झाले सुध्दा कारण यानंतर सुरू झाला द मोहम्मद शमी शो.शमीने आज श्रीलंका संघाचा 8 वा गडी म्हणजेच चमीराला बाद करताना झहीर खान आणि जवागल श्रीनाथच्या विश्वकप स्पर्धेतल्या 44 बळीची बरोबरी केली,विशेष बाब म्हणजे शमीने केवळ 14 च सामन्यात हे बळी घेतले आहेत तर जाहीर खानला या विकेट्स मिळवण्यासाठी 23 सामने खेळावे लागले होते.

या विश्वकप स्पर्धेत तो शमी आग ओकणारी गोलंदाजी करत आहे जो कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने पहिल्या काही सामन्यात संघाबाहेर ठेवला होता, खरे तर मागील काही काळापासून तो संघात इतक्या वर्षाच्या जोरदार कामगिरीनंतरही आत बाहेर आत बाहेर होत आहे.

Chinchwad : मराठा समाजाने केलेल्या जाळपोळीच्या निषेधार्थ तैलिक महासभेचे तहसिलदारांना निवेदन

खास करुन एकदिवसीय सामन्यात तरी,पण जिगरबाज शमीने हे दुःख हा अपमान पचवत योग्य त्या संधीची वाट बघितली आणि जेव्हा संधी मिळाली तेंव्हा तिचे असे सोने केले का आता कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाही प्रश्न पडावा, की आम्ही हे असे केले तर का केले?

आज त्याने तीन सामन्यात दुसऱ्यांदा पाच बळी घेत विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक 45 विकेट्स घेत आपल्या नावावर नवा विक्रम केला.आणि याचबरोबर त्याने सर्वाधिक म्हणजेच 4 वेळा एका सामन्यात 5 वा त्याहून अधिक बळी घेत हा विक्रमही आपल्याच नावावर केला.

या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंका संघाचा डाव केवळ 55 धावांवरच गारद झाला आणि भारतीय संघाने 302 धावांच्या प्रचंड मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवत प्रथम क्रमांकासह उपांत्यफेरीतही शानदार प्रवेश मिळवत मिशन वर्ल्डकपच्या ध्येयाकडेही एक मजबूत पाऊल टाकले आहे.

भारतीय संघाने विश्वकप मधला आपला हा सर्वात मोठा विजय आहे.या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.