World Update: आशादायक! जगभरात तब्बल चार लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त!

बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 23 टक्के तर सौम्य लक्षणे असलेले 68 टक्के, केवळ 3 टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार आणि बळींची संख्या वाढत असतानाच एक आशादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जगभरात तब्बल 4 लाख 4 हजार 32 कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. एकूण रुग्णांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 23 टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 8 हजार 828 आहे. म्हणजे एकूण रुग्णांमध्ये मृत्यूंचे प्रमाण हे सहा टक्के आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 68 टक्के असून केवळ एकूण कोरोनाबाधितांपैकी केवळ तीन टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

कोरोना म्हणजे जागतिक महामारी, मानवजातीचा सर्वनाश अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात बसलेली असताना वस्तुस्थिती स्पष्ट करणाऱ्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो, हा विश्वास दृढ झाल्याशिवाय राहात नाही.

उपचार घेत असलेल्या 12 लाख 67 हजार 496 रुग्णांपैकी 12 लाख 16 हजार 902 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. म्हणजेच एकूण कोरोनाबाधितांच्या तब्बल 68 टक्के कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण तब्बल 96 टक्के आहे. गंभीर अथवा चिंताजनक असलेल्या जगभरातील रुग्णांची संख्या 50 हजार 594 म्हणजे केवळ चार टक्के आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता हे प्रमाण जेमतेम 3 टक्के असल्याचे दिसून येते.

सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांची संख्या चीनमध्ये आहे. आतापर्यंत चीनमध्ये 77 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. स्पेनमध्येही 59 हजार 109 रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीत 57 हजार 400, इराणमध्ये 41 हजार 947, इटलीमध्ये 32 हजार 534, अमेरिकेत 30 हजार453 तर फ्रान्समध्ये 26 हजार 391 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. 

भारतात आतापर्यंत 8 हजार 446 कोरोनाबाधित सापडले असून त्यापैकी 969 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.  भारतात कोरोनाबाधित मृतांची संख्या 288 आहे. महाराष्ट्रात 1 एकूण 761 कोरोनाबाधित असून त्यापैकी आतापर्यंत 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या बळींची संख्या 127 आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.