WTC FINAL – सामना रंगतदार अवस्थेत; तर अजिंक्य रहाणेचे संघात 16 महिन्यांनी दिमाखात पुनरागमन

पिछाडीनंतर भारतीय संघांने केले जबरदस्त प्रतिआक्रमण

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) – जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या (WTC FINAL) विजेतेपदासाठी सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रतिआक्रमणामुळे सामना रंगतदार अवस्थेत पार पडला.

तब्बल 16 महिन्यानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या झुंझार 89 धावांमुळे आणि त्याला शार्दूल ठाकूरने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने फॉलोऑन टाळण्यात जरीही यश मिळवले असले तरीही ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात मिळालेल्या 173 धावांच्या मोठ्या आघाडीमुळे या कसोटीत सलग तिसऱ्या दिवशीही आपला वरचष्मा कायम ठेवण्यात चांगलाच यशस्वी ठरला आहे. असे वाटत असतानाच तिसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला, तेव्हा भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त प्रति आक्रमणामुळे या सामन्यात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 123 धावा केल्या आहेत. ज्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाकडे 296 धावांची मजबूत आघाडी आहे. त्या आधी कालच्या 5 बाद 151 या धावसंख्येपासून पुढे खेळ सुरू करताना भारतीय संघाला पहिला झटका लगेचच बसला. कोडा भरतने यष्टीमागे जरी बऱ्यापैकी कामगिरी केली असली तरीही त्याला फलंदाजीत मात्र आपला ठसा उमटवता आला नाही.

आजही तो फक्त 5 धावा करुन बोलंडच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर खेळायला आला तो अष्टपैलू शार्दूल ठाकूर. त्याने अजिंक्य रहाणेला साथ देताना अतिशय सकारात्मक खेळ सुरू केला. बघता बघता ही जोडी जमली आणि अजिंक्य रहाणे आपल्या पूर्ण जोशात आला. त्याने एक अविस्मरणीय आणि झुंजार खेळी करताना ठाकूर सोबत मोठी भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेर काढले.

त्याची कारकीर्द संपली असे बोलले गेले. तो सातत्यपूर्ण खेळत नाही असेही बोलले गेले. त्याला संघाबाहेर (WTC FINAL) काढले, एक-दोन महिने नाही तर तब्बल 16 महिने. तो दुखावला असेल, निराश झाला असेल पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशेच तो वागला. त्याने कुठेही यावर मत व्यक्त केले नाही. कुठे भडंग, सवंग मुलाखत दिली नाही. की कोणाची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या नाहीत. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला, मेहनत केली. त्याचे फळ त्याला मिळालेच.

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्याला आयपीएलमध्ये केलेल्या धावांनी संधी मिळवून दिली, अन त्या संधीचे सोने करत त्याने या कसोटीत भारतीय संघ अतिशय नाजूक स्थितीत, संकटात असताना संघाला संकटाबाहेर काढण्यात मोठा वाटा उचलून संघ व्यवस्थापन आणि आपल्या चाहत्यांचाही विश्वास सार्थ ठरवत एक अविस्मरणीय आणि तितकीच महत्वपूर्ण खेळी करून आपले पुनरागमन झोकात साजरे केले.

त्याने या खेळीत काही वैयक्तिक पण मैलाचे दगड गाठले. त्याने 5000 धावा पूर्ण करताना अशी कामगिरी करणारा तेरावा भारतीय फलंदाज म्हणून आपले नाव भारतीय क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने गोंदवले आहे. 2013 नंतर आशिया खंडाबाहेर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख आता कायम होत राहील. याच खेळीत त्याने शार्दुल ठाकूर सोबत शतकी भागीदारी करून संघाला फॉलोऑनच्या नामुष्कीतून बाहेर काढले. अर्थात या खेळीत त्याला नशिबाची साथ मिळाली, पण नशीब ही बहाद्दरांनाच साथ देते असे म्हणतात ते खोटे नाही. दुर्दैवाने त्याचे 13 वे शतक होवू शकले नाही, पण रहाणेची ही 89 धावांची खेळी सच्चा क्रिकेट रसिकांच्या मनात चिरकाल वास करत राहील हे नक्की.

तो बाद झाला तेव्हा भारतीय संघाला फॉलोऑनचा धोका होता. अर्थात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला फॉलोऑन देण्यासाठी कधीही उत्सुक नसणार. मात्र तरीही शमी आणि ठाकूरने ती वेळ येणारच नाही हे सुनिश्चित केले. ठाकूरनेही एक जबरदस्त (WTC FINAL) खेळी करत तो किती महत्वपूर्ण खेळाडू आहे हेच सिद्ध केले. त्याने जबरदस्त फलंदाजी करत आपले चौथे अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतक झाल्यानंतर मात्र तो लगेचच बाद झाला, पण त्याआधी त्याने आपले कर्तव्य चोख बजावले होते. तो बाद झाला अन अपेक्षेप्रमाणे भारताचा डावही लगेचच समाप्त झाला. ठाकूर आणि रहाणेच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारताने 296 धावा केल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला 173 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाकडून कर्णधार कमिन्सने सर्वाधिक तीन तर स्टार्क, बोलंड व ग्रीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यानंतर आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली.खतरनाक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या वॉर्नरला मोहम्मद सिराजने फक्त 1 धावांवर असताना तंबूत परत पाठवून संघाला चांगली सुरुवात करुन दिली.यानंतर थोड्याच वेळात उमेश यादवने उस्मान ख्वाजाला बाद करुन दुसरे मोठे यश मिळवून दिले.यावेळी ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 2 बाद 24 अशी झाली होती.

यानंतर मात्र पहिल्या डावातील शतकवीर स्मिथ आणि लांबूशेन या जोडीने 62 धावांची मोठी भागीदारी करुन या दोन विकेट्समुळे आलेले दडपण बऱ्यापैकी कमी केले. दोघेही चांगले खेळत होते. त्यामुळे रोहितची काळजी वाढत होती, पण अखेर जडेजाने स्मिथला वैयक्तिक 34 धावांवर असताना ठाकूरच्या हातून झेलबाद केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले. तो बाद झाला अन त्याच्या जागी आला तो पहिल्या डावातला आणखी एक शतकवीर हेड. त्याने आक्रमक अंदाजात खेळायला सुरुवात केली, पण त्याला सिराजने चांगलेच सतावले होते.

त्याने 2 षटकार मारत भारतीय गोलंदाजांना बोथट ठरवण्याचा प्रयास केला पण तो चांगला अंगलट आहे. चतुर जडेजाने त्याला अचुक जाळ्यात पकडत आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत संघाला मोठे यश तर मिळवून दिलेच,पण सोबत सामन्यातही रंगत निर्माण केली. यानंतर ग्रीन खेळायला आला आणि त्याने लांबूशेनला उत्तम साथ देत आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ समाप्त होईपर्यंत संघाची आणखी पडझड होवू दिली नाही.

आजचा खेळ समाप्त झाला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 123धावा केल्या आहेत. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाकडे धावांची 296आघाडी आहे. असे असले तरीही भारतीय गोलंदाजांनी आजच्या सारखीच गोलंदाजी उद्याही करून कांगारू संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखले तर सामन्यात चमत्कार नक्कीच होवू शकतो.

संक्षिप्त धावफलक – WTC FINAL
भारत पहिला डाव
सर्वबाद 296
रहाणे 89,शार्दूल 51,शमी 13
कमिन्स 83/3,बोलंड 59/2,ग्रीन 44/2
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव सर्वबाद 469
दुसरा डाव
4 बाद 123
ख्वाजा 13,स्मिथ 34,हेड 18
लांबूशेन नाबाद 39
जडेजा 25/2,उमेश 20/1

Today’s Horoscope 10 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.