WTC FINAL- ऑस्ट्रेलियाच चॅम्पियन

आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा एकमेव संघ

एमपीसी न्यूज – (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) भारतावर मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच चॅम्पियन. आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा पहिला संघ.

पाच वेळा एकदिवसीय विश्वकप जिंकून, टी -20,आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला फक्त ही एकच स्पर्धा जिंकता आली नव्हती, आज तीही कसर भरून काढत भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत करत मोठा विजय प्राप्त केला.या विजयासह अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ बनला आहे.तर सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश करुनही भारतीय संघाला जेतेपदाने हुलकावणीच दिली.

Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त मानाच्या दिंड्या मंदिरात येण्यास सुरवात

भारतासाठी आज खूप मोठा दिवस होता अन आव्हानही तितकेच मोठे. भारतीय फलंदाजीची खोली बघता आणि ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचे मागील काही काळातले वर्चस्व बघता भारतीय संघ आज इतिहास रचणार का हे बघणे खूप औत्सुक्याचे होते. मात्र या आशेला तेंव्हाच सुरंग लागला जेव्हा कालपासून जबरदस्त दृढनिश्चय दाखवणाऱ्या विराट कोहलीला आपल्या आणखी एका वैयक्तिक विक्रमी अर्धशतकाजवळ असताना बोलंडने  एका अप्रतिम चेंडूवर चकवले आणि स्लिप मध्ये उभे असलेल्या स्मिथने एक अविश्वसनिय झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली.हा धक्का संपूर्ण भारतीय संघासाठी खूपच मोठा होता, याच्या एकच चेंडू आधी कोहली विरुद्धचे मोठे अपील पंचांनी फेटाळून लावल्यानंतर कोहलीच्या विकेटसाठी आसुसलेल्या कांगारूनी डीआरएसचाही सहारा घेतला होता, पण त्यात त्यांच्या विरोधात गेले, पण दुसऱ्याच चेंडूवर बोलंडने भारताच्या सर्व आशाआकांक्षाचा विस्कोट केला .

या धक्क्यातून सावरण्याआधीच बोलंडने रवींद्र जडेजालाही याच षटकात शून्यावरच बाद केले अन आपल्या संघाची ट्रॉफी जवळपास पक्की केली अन त्याचबरोबर  भारतीय संघाचा पराभवही. यानंतर केवळ अन केवळ काही चमत्कार झाला तरच वेगळा निकाल अपेक्षित होता, अन्यथा ऑस्ट्रेलियन संघाची आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धाची त्यांच्याकडे नसलेली ही एकमेव ट्रॉफी  पक्की होती. बोलंडने याच षटकातल्या शेवटच्या चेंडूंवर कोडा भरतलाही जवळजवळ बादच केले होते, पण चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून सीमापार गेला.

यानंतर भारतीय संघ किती वेळ लढत देत राहणार हाच प्रश्न होता. यानंतर पहिल्या डावात जबरदस्त आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या रहाणे आणि भरत या जोडीने आपला प्रतिकार चालू ठेवला, रहाणे पहिल्या डावातल्या सारखाच धीरोदात्तपणे खेळत आहे असे वाटत असतानाच वैयक्तिक 46 धावांवर असताना मिशेल स्टार्कच्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर एक अतिशय खराब फटका मारून झेलबाद झाला अन भारतीय संघाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या .यानंतर भारताचा पराभव अटळ दिसत होताच. त्यातच शार्दूल ठाकूरही आल्या पावली परत गेला.

कसोटी क्रिकेट म्हणजे सयंम,पराकोटीचा मनोनिग्रह दाखवणे. मान्य आहे आजच्या  एकदिवसीय अन टी 20 च्या काळात प्रेक्षकांना जलदगतीचा खेळ आवडतो,त्यामुळेच जास्तीत जास्त सामने निकाली व्हायला लागलेत,पण म्हणून तुम्ही कसोटीचा मूलभत मंत्रच विसरणे योग्य नाही. आज ऑस्ट्रेलियन संघांने भारताच्या विकेट्स मिळवल्या असे म्हणण्यापेक्षा भारतीय रथी महारथी फलंदाज म्हणून मिरवणाऱ्या खेळाडूंनी अतिशय खराब फटक्यांची निवड करत आपापल्या विकेट्स बहाल केल्या असे म्हटले तर त्यात काहीही वावगे असणार नाही.

गीलचा अपवाद सोडला तर इतर सर्व फलंदाज अतिशय बेजबाबदार फटके मारुन बाद झाले अन तिथेच भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला.खेळ म्हटले की कुणी तरी जिंकणार कुणी तरी हारणार हे मान्य असले तरीही विश्व कप स्पर्धेच्या अंतीम सामन्यात असा खेळ विश्व चॅम्पियन कधीही बनवू शकत नाही, त्यामुळेच हा पराभव पुढील कित्येक वर्षे असली क्रिकेटरसिकांना सलत राहील हे नक्की. 

पॅट कमिन्सच्या हातात झळाळता करंडक देताच ऑस्ट्रेलियन संघाने एकच जल्लोष केला.13 कोटी रुपये आणि झळाळती सोनेरी ट्रॉफी विजयाने ऑस्ट्रेलियन संघाला प्राप्त झाली. पहिल्या डावात जबरदस्त खेळी करणाऱ्या ट्रेविस हेडला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव 469 आणि दुसरा डाव 8 बाद 270 घोषित
भारत
पहिला डाव सर्वबाद 296
आणि दुसरा डाव
सर्वबाद 234
कोहली 49,रोहीत 41,गील 18,रहाणे 46
भरत 23
बोलंड 46/3,लायन 41/4,स्टार्क 75/2

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.