YCMH News: रुग्णालयात रिसेप्शनिस्ट, कौन्सिलरची नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि रुग्णांना, तसेच त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘कोरोना निर्धारित परिसरा’त महापालिकेकडून 10 रिसेप्शनिस्ट आणि 10 कौन्सिलर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे ‘कोविड समर्पित रुग्णालय’ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. माहितीअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ उडते. या पार्श्वभूमीवर वायसीएमएचमध्ये रिसेप्शनिस्ट आणि कौन्सिलर यांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पुढे आला.

‘मेसर्स रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेमार्फत 10 रिसेप्शनिस्ट आणि 10 कौन्सिलर या कर्मचाऱ्यांची किमान वेतनदरानुसार 23 हजार 300 मानधनावर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांचे कामकाज तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. पहिल्या शिफ्टमध्ये चार रिसेप्शनिस्ट आणि चार कौन्सिलर, दुपारच्या सत्रात चार रिसेप्शनिस्ट आणि चार कौन्सिलर, तसेच रात्रीच्या सत्रात दोन रिसेप्शनिस्ट आणि दोन कौन्सिलर कामकाज पाहत आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीसाठी नऊ लाख 32 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.