Pune : संघ परिवाराचे गांधीजींच्या जीवनावर प्रेम नाही-  निरंजन टकले

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताह निमित्त आयोजन

एमपीसी न्यूज- संघ परिवाराने गांधीना प्रात: स्मरणीय केले असले तरी गांधीजींच्या जीवनावर, सत्याच्या मार्गावर त्यांचे प्रेम नाही तर गांधीजींच्या मृतदेहावर त्यांचे प्रेम आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केली. “गांधींच्या वाटेवर” या विषयावर निरंजन टकले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कुमार सप्तर्षी होते.

निरंजन टकले म्हणाले, “गांधीजींच्या भारत यात्रेला 100 वर्षे झाली तेव्हा प्रेरणेतून मी त्याच मार्गावर प्रवास केला. तेव्हा प्रत्येक सामान्य माणसात गांधीजींचे दर्शन मला झाले. “दरिद्री, अशिक्षित , भाषा , पंथ , धर्म या मुद्द्यांवर विभागलेल्या देशाला गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात अंहीसेने लढवून, जिंकवून दाखवले. हाती घेतलेली प्रत्येक गोष्ट ते पूर्ण करीत असत. व्हाईसरॉय पेक्षा गांधीजींचा पत्र व्यवहार, ट्रंक कॉल चा दुप्पट होता. हा जनसंपर्क चा आग्रह नंतर जनतेने लोकप्रतिनिधींकडून धरला नाही. उंट, सायकल, पायी, घोडे सर्व उपलब्ध माध्यमे त्यांनी वापरली. ‘मी सनातन हिंदू आहे’ असे सांगूनही गांधीजींनी सर्व समावेशक भूमिका स्वीकारली होती. गांधीजींचे नाव सर्व भिंतीना ओलांडणारे होते, ते 98 टक्के हिंदूंचा पाठिंबा मिळवून होते. म्हणून त्यांची हत्या झाली.
सत्याचा आग्रह धरण्याची ताकद गांधीजी देतात. नैतिक बळ गांधीजी देतात. म्हणून मजबुती का नाम महात्मा गांधी आहे”

“संघ परिवाराने गांधीना प्रात: स्मरणीय केले असले तरी गांधीजींच्या जीवनावर , सत्याच्या मार्गावर त्यांचे प्रेम नाही. त्यांचे प्रेम गांधीजींच्या मृतदेहावर आहे. त्यामुळे केवळ स्वच्छतेचा झाडू एवढी एकच गोष्ट गांधीजींची असावी, असे भासविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गांधींच्या खुन्याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न होत असले, नथुरामचे मंदिर उभारण्याचे प्रयत्न होत असला, तरी एकाची ही आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवता आलेले नाही, ही लाज अजूनही शिल्लक आहे, असे मला एका बिगारी मुलाने प्रवासात सांगितले”असा अनुभवही निरंजन टकले यांनी सांगितला. असे सामाजिक शहाणपण आजही समाजात असून त्याला बळ दिले पाहिजे असे टकले म्हणाले.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार असेल तर पंतप्रधानांना रोज पत्र लिहू- निरंजन टकले

पंतप्रधानांना विरोधाचे पत्र लिहिणाऱ्या लेखक,विचारवंतांना ,कार्यकर्त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर मी पंतप्रधानांना रोज पत्र लिहीन, हा देश भयमुक्त रहावा, पुढील पिढ्यांना तो तसाच लाभावा, अशी इच्छा असल्याने मी माझ्या प्रयत्नांचा भाग म्हणून ते करेन, असे निरंजन टकले यांनी या व्याख्यानात सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.