Chakan : एटीएम सेंटरमधील अलार्म वाजल्याने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला; चाकण पोलिसांकडून दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोरटे चोरी करत असताना मशीनचा अलार्म वाजला. याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात समजली. कार्यालयातून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. माहिती मिळताच सतर्क पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून चोरट्यांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) पहाटे चाकण जवळ महाळुंगे गावात घडली.

विनय शाम पांडे (वय 23, रा. चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश), आकाश हिरासागर तिवारी (वय 23, रा. चाकण. मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या चोरीचा प्रयत्न करणा-यांची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ उत्तम कणसे (वय 35, रा. दिघी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विजय सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे गावात वाघजाईनगर येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. दोन्ही चोरट्यांनी एटीएम मशीनचे पुढचे झाकण उघडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. झाकण उघडत असताना एटीएम मशीनचा अलार्म वाजला आणि याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयाला मिळाली. बँकेने पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. नियंत्रण कक्षाने चाकण पोलिसांना एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार, चाकण पोलिसांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली.

पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही चोरट्यांनी एटीएम सेंटरमधून धूम ठोकली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. परिसरात नाकाबंदी करण्यात आली. काही तासातच चोरट्यांना पकडण्यात चाकण पोलिसांना यश आले. दोघेही चोरटे एटीएम सेंटरच्या जवळ राहत आहेत. एटीएम सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचे लक्षात घेत त्यांनी मशीन फोडून पैसे चोरण्याचा डाव आखला. पण मशीनचा अलार्म वाजल्याने तसेच चाकण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.