Kalewadi Crime News : ज्येष्ठ नागरिकाला भीती घालून पावणे दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – बॅंक खात्यावर रक्‍कम जास्त झाली आहे. यामुळे तुमच्यावर आयकर विभाग, पोलीस विभाग यांच्याकडून कारवाई होईल, अशी भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2014 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत कोकणेनगर, काळेवाडी येथे घडला.

आप्पासाहेब पांडूरंग मिठारी (वय 63, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी गुरुवारी (दि. 9) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मनिष मेहता (मोबाइल क्रमांक 8793727067), संजय कुलकर्णी (मोबाइल क्रमांक 8082110366), गणेश ठाकुर पियुष, अनिकेत, विलास शाखापुरे (मोबाइल क्रमांक 8979333887), नरेंद्र प्रसाद यादव, सतीश पाटील (मोबाइल क्रमांक 8080777803), संतोष रायकर (मोबाइल क्रमांक 9768545429), राहूल सावंत (मोबाइल क्रमांक 8976101310), प्राची मॅडम (मोबाइल क्रमांक 7208501112), श्रृती अग्रवाल (मोबाइल क्रमांक 8286416044), हरीश रेड्डी (मोबाइल क्रमांक 7208505202), सदाशिव रामचंद्र पाटील (मोबाइल क्रमांक 8097379995) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी मिठारी यांना फोन करून ऍगॉन रिलीगिअर लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी घेण्यासाठी तसेच त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला इनकम मिळवून देतो, असे अमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यावरील रक्‍कम जादा झाल्याचे सांगून आयकर विभाग, आयआरडीए ब्रॅंच मॅनेजर, क्राईम ब्रॅंच पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांना भीती घातली.

फिर्यादी यांच्याकडून 39 लाख 71 हजार रुपये रोख, तसेच विविध बॅंकेच्या खात्यावर धनादेशाद्वारे एक कोटी 45 लाख 34 हजार 66 रुपये असे एकूण एक कोटी 85 लाख पाच हजार 66 रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.