Lonavala: कार्ला गडावरील पाण्याचे 16 अनाधिकृत नळजोड तोडले

प्रशासनाची कारवाई; नागरिकांकडून संताप व्यक्त

एमपीसी न्यूज़ – एकविरा देवीच्या कार्ला गडावरील रहिवाश्यांनी एकविरा देवस्थानच्या पाण्याच्या लाईनवरुन अनाधिकृतपणे घेतलेले 16 नळ जोड प्रशासनाने बुधवारी कारवाई करुन तोडले. नागरिकांची पुरती गैरसोय होऊ नये याकरिता एक नळजोड ठेवण्यात आला आहे. गडावरील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडून पाण्याची स्वतंत्र लाईन घेऊन त्या लाईनवरुन अधिकृत नळजोड घ्यावेत अशा सुचना मावळचे तहसिलदार तथा श्री एकविरा देवस्थानच्या प्रशासकिय समितीचे सचिव रणजित देसाई यांनी केल्या आहेत.

एकविरा गडावर येणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता देवस्थानच्या वतीने काही वर्षापुर्वी गडावर पाण्याची चार इंची लाईन टाकली आहे. गडावर राहणारे काही नागरिक व दुकानदार यांनी या लाईनवर सुमारे सोळा ते सतरा ठिकाणी अनाधिकृत नळजोड घेतल्याने भाविकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पुढिल आठवड्यात कार्ला गडावर एकविरा देवीची चैत्री यात्रा होणार आहे. पाण्या अभावी गडावर येणार्‍या भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने ही गैरसोय टाळण्याकरिता प्रशासनाने सर्व अनाधिकृत नळजोडांवर कारवाई करत ते बंद केले. गडावरील अनाधिकृत नळजोडणीबाबत वारंवार तक्रारी देखिल दाखल असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.

प्रशासनाने ऐन ऊन्हाळ्यात व यात्रेच्या दरम्यान ही कारवाई केल्याने गडावरील नागरिकांचे पाण्याकरिता मोठे हाल होणार आहेत. मागील अनेक वर्षापासूनचे हे नळजोड असून त्यांना रितसर परवानगी देण्याबाबत पुर्वी ट्रस्टने देखिल संमती दर्शवली असल्याचे या नागरिकांचे म्हंणणे आहे. यात्रेकरिता गडावर लाखों भाविक येतात तसेच शनिवार, रविवार व देवीच्या वारांना गडावर मोठी गर्दी असते या गर्दीचा सामना करत महिलांना गडाच्या पायर्‍यांची चढ उतार करत पिण्याचे पाणी वाहून नेहण्याची वेळ येणार असल्याने ग्रामस्तांनी प्रशासनाची कारवाई व तक्रारदार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान,  नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता एक नळजोड ठेवला असून त्यांनी ग्रामपंचायतीकडून स्वंतत्र पाणीलाईन टाकून घ्यावी असे तहसिलदार देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.