शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

वाह उस्ताद….झाकीर हुसेन यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचीही दाद

एमपीसी न्यूज – येरवडा कारागृह हे राज्यातील सर्वात मोठे मध्यवर्ती कारागृह आहे. या ठिकाणी कच्चे कैदी आणि शिक्षा भोगत असलेले मिळून साडेतीन हजार कैदी आहेत. आयुष्याच्या एका टप्प्यावर केलेल्या चुकीमुळे कारागृहाच्या भिंतीआड बंदिस्त झालेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील या कैद्यांशी झाकीर हुसेन यांनी आज संवाद साधला, त्यांना बोलते केले, त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला आणि या तुरुंगाच्या भिंतीबाहेर भेटण्याचे निमंत्रण दिले. निमित्त होते भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या प्रेरणापथ या कार्यक्रमाचे.

येरवडा कारागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारावर कैदी सहभागी झाले होते. सुरुवातीला झाकीर हुसेन समोर बसलेल्या कैद्यांना उद्देशून म्हणाले की, इथे तुमच्यासमोर कार्यक्रम साजरा करताना मला आनंद होत आहे, परंतू  मी टिळक स्मारक, बालगंधर्व सभागृह अथवा देशातील कुठल्याही रंगमंचावर तबला वाजवत असेल, तेथे तुम्ही याल आणि मला आपण येरवडा कारागृहात भेटलो असल्याची आठवण करून द्याल अशी आशा आहे. मी या तुरुंगाच्या भिंतीपलीकडे तुमची वाट पाहीन. तसेच तुरुंगात अधिकारी आणि कैद्याचे नाते असण्यापेक्षा मित्रत्वाचे नाते असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

यानंतर हाताच्या बोटातून तबल्यातून बोल वदवून घेणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबलावादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या वादनातून रेल्वे इंजिन, शंख आणि डमरू यांच्या आवाजाचे आभास निर्माण करत तबल्याच्या तालावर मंत्रमुग्ध होणे कसे असते, संगीतप्रेमींचा जल्लोष कसा असतो याचे प्रात्यक्षिकच येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाले.

रखरखीत उन्ह असतानाही झाकीर हुसेन यांनी एकाहून एक ताल साजरे करत हजाराच्यावर असलेल्या कैद्यांसहित अधिकारी वर्गालाही मंत्रमुग्ध केले. कारागृहातील गेल्या अनेक वर्षांतील ही अविस्मरणीय मैफल ठरली, अशी भावना एका पोलीस अधिका-याने कार्यक्रमानंतर व्यक्त केली. 

यावेळी विनित आरोळे नामक एका कैद्याने दोस्ती या चित्रपटातील चाहुंगा मै..तुझे…सांझ-सवेरे हे गीत सादर केले. यावेळी झाकीर हुसेन यांनी तबल्यावर ठेका धरत त्याला साथ दिली. तर साताराच्या कारागृहात तुरूंग अधिकारी असलेल्या तेजश्री पोवार यांनी दस्तुरखुद्द उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासमोर त्यांच्याच तबल्यावर ताल धरला. त्यांनी सुद्धा या अधिकारी महिलेच्या वादनाचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी दोस्ती चित्रपटातील अजरामर असलेले हे गीत रफी साहेब गाणार नव्हते. ते कुणा दुस-याच गायकासाठी होते. परंतू रफी साहेबांना हे गीत इतके आवडले की त्यांनी एक रुपया सुद्धा न घेता हे गाण गायल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली.

कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना ते म्हणाले, आजवर मी अनेक मोठमोठ्या महोत्सवात कार्यक्रम साजरे केले. त्या कार्यक्रमा दरम्यान निर्माण होणारे वातावरण येथेही पहायला मिळाले. शेवटी जाताना त्यांनी पुन्हा एकदा कैद्यांना उद्देशून मला तुम्हाला भेटायचे आहे पण ते तुमच्या किंवा माझ्या शहरात, तुरूंगाच्या भिंतीपल्याड.
spot_img
Latest news
Related news