बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

पुणे व पिंपरी-चिंचवड येथे प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज (रविवारी) सायंकाळी साडेपाच वाजता सांगता झाली. मंगळवारी (दि.21) मतदान होणार असून गुरुवारी (दि. 23) निकाल लागणार आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी शेवटच्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोड शो करत मतदारांशी संवाद साधला. निगडी येथे जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी पिपरी-चिंचवडचे सर्वत्र कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्वरसागर कार्यक्रमा दरम्यान शहरात आलेले जसराज पंडित हे देखील आपले शहर पाहून भारावले होते.

यावेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. या तिघांनीही सांगावे की त्यांना पक्षाच्या नावाखाली कधी काय चुकीचे करण्यास सांगितले होते का? तसे असेल तर मी माझ्या नावापुढे पवार हे नाव लावणार नाही, असेही ते म्हणाले. अजित पवार यांची आज ही प्रचाराची सांगता सभा होती. 

तर, भाजपतर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी कोपरासभा घेण्यात आल्या. तसेच भोसरीत आमदार महेश लांडगे यांच्याकडून पदयात्रा काढण्यात आली होती. तर उमेदवारांनी वैयक्तीक रित्या प्रचारावर भर दिला. 

पुण्यातही प्रचाराची सांगता करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा रोड शो केला गेला. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही जाहीर सभा पार पडली. तसेच भाजपतर्फे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. 

दिवसभरात शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, पोलीस कारवाई, आश्वासनांचा पाऊस, करणी-जादूटोणा, पदयात्रा, रॅली, जाहीर सभा, वैयक्तीक भेटी अशा विविध घटनातून प्रचाराच्या दिवसाची सांगता झाली.
spot_img
Latest news
Related news