‘बमबमभोले’च्या गजरात महाशिवरात्र साजरी

एमपीसी  न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ‘बमबमभोले’च्या गजरात सर्व शिवमंदिरांतून ‘महाशिवरात्र’ भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग, अशा भक्तिमय वातावरणात पुणे पिंपरीतील ठिकठिकाणच्या शिवमंदिरामध्ये महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली.

महाशिवरात्री’निमित्त शहर परिसरातील शिवमंदिरे विद्युत रोषणाईने नटून गेलेली होती. महारुद अभिषेक, होमहवन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांनी शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. शहरातील शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती तसेच, फुलमाळांनी मंदिरे सजविण्यात आली होती.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण दिसून आले. ठिकठिकाणी प्रसाद वाटण्यासाठी धार्मिक संस्थांनी स्टॉल्स उभारलेले होते. सिंधी कॅम्पात पाणी, सरबत वाटप करण्यात आले होते. याशिवाय बेल रोपांच्या विक्रीचे स्टॉलही लावण्यात आले होते. शहरातील चिंचवड गावातील धनेश्वर, पिंपरीगावातील तपोवन, मोहननगर येथील महादेव मंदिर, पिंपळेगुरव, सांगवी, भोसरी, मोहननगर, फुगेवाडी, आकुर्डी येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.