यशप्राप्तीसाठी नियोजन महत्त्वाचे – डॉ. संजय धांडे

राष्ट्रीय रोबोकॉन-2017 स्पर्धेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी पूर्व नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या पंखांना कल्पनेचे बळ मिळाले, तर नक्कीच यश तुमच्या हातात असेल, असा सल्ला कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे यांनी दिला.

दुरदर्शन (प्रसारभारती) व एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय रोबोकॉन-2017 स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक शिवाजी फुलसुंदर, कॅपजेमिनी इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष किशोर विखे, मॅथ वर्क इंडिया प्रा. लि. चे डॉ. विजू रविचंद्र, रोहमचे महाव्यवस्थापक निरंजन जी, मॅथ वर्क विद्यार्थी स्पर्धेचे व्यवस्थापक लैरेन टैपल्यूस्काय, जेनेटीक्स इंडिया प्रा. लि.चे अतिरिक्त महाव्यवस्थापक नचिकेत जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रा.पी.बी. जोशी, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी संचालक व रोबोकॉनचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील कराड व आळंदी येथील एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव आदी उपस्थित होते.

डॉ. संजय धांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे अशा गोष्टींची निर्मिती करावी, ज्याचा फायदा सॉफ्टवेअर व उत्पादक कंपन्यांच्या योजनांना उपयुक्त ठरेल. या स्वरुपाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करतात. त्याचे श्रेय त्यांना मिळायलाच हवे. सोबतच विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये त्यांच्या शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरते. त्यांच्या सहयोग व मार्गदर्शनाने विद्यार्थी नवनिर्मिती करू शकतात. यासाठी शिक्षकांसोबतच त्यांच्या महाविद्यालयांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. महाविद्यालयाने, असे वातावरण तयार करावे जेणेकरून विद्यार्थी प्रगती करू शकतील.

रोबोकॉनसारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये संघभावना महत्त्वाची असते. आपल्या पारंपारिक शिक्षणाबरोबरच प्रात्यक्षिक कौशल्य आवश्यक आहे. रोबो बनविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय व विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच नामांकित कंपन्यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पांना आर्थिक पाठबळ द्यावे. यातून निर्माण होणार्‍या मनुष्यबळाचा उपयोग उद्योगधंद्यांना होऊन समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास होईल.

डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले की, आपल्या देशातील विद्यार्थी त्यांच्या रचनात्मक विचारधारेमुळेच नासामध्ये देखील कार्यरत आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात आपला देश प्रगतीपथावर आहे, त्याचप्रमाणे हार्डवेअर क्षेत्रातही आपण प्रगती करणे आवश्यक आहे. ही रोबोटिक्स स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, प्रगती आणि नवीन कल्पनांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. आव्हानांचा सामना करणे व सृजनशीलता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या जर प्रत्येकाने आत्मसात केल्या तर आपण नक्कीच यश मिळवू. 


शिवाजी फुलसुंदर म्हणाले, रोबोकॉन ही स्पर्धा केवळ तीन संघांवर सुरु झाली. आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 112 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला अनेक कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा विकास होतो.

किशोर विखे व डॉ. विजू रवीचंद्रन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौम्या आणि विशाल यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनप्रसंगी  कॉलेज ऑफ इजिनिअरिंग, पुणे व वडोदरा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन संघांमध्ये सामना झाला. त्यामध्ये कॉलेज ऑफ इजिनिअरिंग, पुणे हा संघ विजयी झाला.

या राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून 112 संघांनी भाग घेतला आहे. या रोबोकॉन – 2017 या स्पर्धेचा विषय असोबी – द – लँडिंग डिस्क हा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.