पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर असल्यामुळे राष्ट्रवादीचा गटनेता महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. 
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी योगेश बहल यांची गटनेतेपदी निवड केली. पुण्याच्या  विभागीय आयुक्तांना याबाबतचे पत्र  देण्यात आले आहे. 

योगेश बहल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी महापौर, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षही ते होते. सध्या पक्ष प्रवक्तेपदाची धुराही ते सांभाळत आहेत. त्यांची नगरसेवकपदाची सहावी टर्म असून महापालिकेतील कामकाजाचा 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगर, महेशनगर, कासारवाडी प्रभागातून निवडून आले आहेत. 

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. राष्ट्रवादीला यंदा प्रथमच विरोधकांची भूमिका पार पाडावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. राष्ट्रवादी दुस-या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गटनेता पिंपरी महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे.  

”गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालाट केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेणार आहोत. सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवणार आहे. विरोधाला विरोध करणार नाही. विकासकामांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार आहे. चुकीच्या कामांना राष्ट्रवादी प्रखर विरोध करेल, असे योगेश बहल यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.