पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये बंडाळी; शहराध्यक्षांचा राजीनामा मंजूर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या शहर काँग्रेसमध्ये दुफळी माजण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पदाचा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करुन निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची मागणी, काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांनी केली आहे. 


”शहर काँग्रेस पक्ष बचाव” या मथळ्याखाली काँग्रेसच्या निवडक नेत्यांची आज (रविवारी) माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्या निवास्थानी बैठक झाली. बैठकीच्या अध्यस्थानी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे होते. काँग्रेस प्रदेश मागासवर्गीय विभागाचे संयोजक मनोज कांबळे, माजी नगरसेवक रामचंद्र माने तसेच प्रदीप पवार, सचिन कोंढरे, दिलीप पांढरकर, उमेश बनसोडे, निखिल भोईर, एस.टी. कांबळे, दिगंबर भालेराव, बाळू जगताप, अर्चना मिश्रा, राजन पिल्ले, मंगला मोहिते, मयूर काळभोर, सुनील डोईजड, दीपक जगताप, कमल श्रोत्री आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

महापालिका निवडणुकीत शहर काँग्रेसमध्ये चुकीचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे.  निवडणुकीत झालेल्या चुकीच्या निर्णयाचा आणि धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. शहराध्यक्षांनी पदाचा दिलेला राजीनामा पक्षश्रेष्ठींनी त्वरित मंजूर करावा. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांनी बैठकीत मागणी केली. 

महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करताना कार्ड कमिटीला विश्वासात घेतले नाही. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी 250 जणांनी मुलाखती दिल्या होत्या मात्र, 59 ठिकाणीच उमेदवार दिले गेले. 128 जागांसाठी उमेदवार का देऊ शकलो नाहीत. काही ठिकाणी पक्षाची उमेदवारी मागूनही उमेदवारी देण्यात आली नाही. कडवी झुंज देणारे उमेदवार काँग्रेसकडे होते. पक्षाने त्यांनाही उमेदवारी दिली नाही, असे आरोप बैठकीत करण्यात आले.

उमेदवारी देताना जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. प्रभाग एवढा मोठा असताना वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे गरजेचे होते. पंरतु, प्रभागात एकाच विभागात राहणा-या चार जणांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा परखड भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

बैठकीतील पदाधिका-यांनी शहरात काँग्रेस मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली. काँग्रेसचे काम एकमुखाने करण्याच्या ठराव देखील पारित करण्यात आला. यानिमित्ताने काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एखदा उफाळून आली आहे. शहर काँग्रेसमध्ये पूर्वीपासून दोन गट होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.  

काँग्रेसचे कार्यकर्ते शुक्रवारी (दि.17) प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेणार आहेत. निवडणुकीत झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत. तसेच शहराध्यक्षांनी दिलेला  राजीनामा मंजूर करुन निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची मागणी करणार आहेत. 

दरम्यान, महापालिका निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून सचिन साठे यांनी शहराध्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राजीनामा मंजूर करु नये, अशी मागणी नेत्यांकडे केली होती. प्रदेशाध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा फेटाळला होता.  

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसच्या एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यात पक्षांतर बंडाळी उफाळून आली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसचे भवितव्य यापुढे काय असणार असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.