‘सेव्ह आराध्या अभियान’ साठी पुण्यात रविवारी रॅली

विद्यार्थी, नागरिक होणार सहभागी

एमपीसी न्यूज –  नवी मुंबईच्या आराध्या मुळे या चार वर्षाच्या चिमुकलीला वर्षभरापूर्वी ह्रदयाचा आजार (डायलेटेड कार्डिओमायोपॅथी) झाला आहे. तिला त्वरीत ह्रदय प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र 25 वर्षे वयाच्या आतील आणि 40 ते 50 किलो वजन असलेली ब्रेन डेड व्यक्ती तिला ह्रदयाचे दान करू शकते. या विषयाची जनजागृती करण्याबाबत ‘सेव्ह आराध्या अभियान’ सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी दुपारी चार वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर ते गुडलक चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक आणि तेथून मॉर्डन कॉलेज मार्गाने परत बालगंधर्व  येथे रॅली विसर्जित होणार आहे. या जनजागृती रॅलीमध्ये  सहभागी व्हावे, असे अवाहन आयोजकांनी केले आहे.

योगेश व प्रतिभा मुळे या दांपत्याची आराध्या ही चिमुकली सध्या मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्या ह्रदयाची क्षमता केवळ 10 ते 15 टक्केच आहे. केवळ ह्रदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) कडेही ह्रदयासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मात्र केवळ 25 वर्षाच्या आतील आणि 40 किलोग्राम वजनाच्या आतीलच ब्रेनडेड व्यक्ती तिला ह्रदयाचे प्रत्यारोपण हाऊ शकते. या प्रकारचा दाता मिळणे दुर्मिळ आहे म्हणून आरध्या चे ह्रदय प्रत्यरोपण अद्याप होऊ शकले नाही. तिचे प्रत्यारोपण झाल्यास हे भारतातील दुसरया क्रमांकाचे सर्वात लहान बालकाचे  प्रत्यरोपण ठरणार आहे. म्हणून  या वयोगटातील ब्रेनडेड रुग्ण झाल्यास संबंधित रुग्णालयांनी किंवा नातेवाईकांनी झेडटीसीसी किंवा मुंबईतील फोर्टीस रूग्णालयाला संपर्क करून आराध्याला नवीन जीवन देण्यास मदत करावी, असे आवाहन आरध्या चे मामा सतीश  जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी वैशाली यादव चे काका प्रताप यादव आणि पनवेल येथील ‘घाटी मराठी’ या संघटनेचे संघटक अक्षय ननावरे उपस्थित होते.

आराध्याला ह्रदय मिळण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विदयार्थी – विदयार्थीनी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तरी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे अवाहन आयोजकानी केले आहे. गरीबांसाठी टू डी ईको आणि डायलेसीस शासनाने मोफत कराव्या असे प्रताप यादव यांनी सांगितले. तर अवयव दान करण्याविषयी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत अक्षय ननावरे यांनी व्यक्त केले.

वैशालीही होणार रॅलीत सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून ह्रदयशस्त्रक्रिया करवून घेणारी वैशाली यादवही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. चिमुकल्या आराध्याला ह्रदय मिळण्यासाठी वैशाली हातामध्ये ‘सेव्ह आराध्या’ हे पोस्टर घेउन जनजागृती करणार आहे.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.