रौद्र रूपाचा दिलदार लिंगाणा ! (Video)

(स्वप्निल पंढरीनाथ घोलप, नेरुळ, नवी मुंबई)

नेहमी दुर्गराज रायगडावर गेले की मनात एक खंत येते .. ती म्हणजे समोरून नटलेला लिंगाणा प्रत्येकाला साद घालत असतो. पण, कधी योग येईल ते सांगताच येत नाही. कारण तो रौद्र रूप धारण करून मनात भीती निर्माण करतो. अतिशय दणकट असा लिंगाणा नेहमी खुणावतो की माझ्याही दर्शनाला या ! अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असणारा लिंगाणा.. त्यात आम्हीही होतोच. पण तो सत्यात उतरवण्याचा योग लवकरच आला..लिंगाणाचे दुरून दिसणारे रौद्र रूपाचे जवळून दर्शन घेतल्यावर मात्र त्याच्या दिलदार व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो.

लिंगाणा किल्ला हा जेमतेम 950 मीटर उंचीचा डोंगरी प्रकारचा किल्ला आहे. चढणीस अवघड असा किल्ला. किल्ले लिंगाणावरून पश्‍चिमेस दुर्गराज रायगड तर पूर्वेस तोरणा आणि राजगड दर्शन देतो. रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची सदर, नगारखाना येथून सहज दिसून येतो. लिंगाणा मोहीम ठरली, लिंगाणा सर करायचा दिनांक 3 डिसेंबर 2017 रविवार. ही मोहीम शिवराष्ट्र हायकर्स, कोल्हापूर आणि शिखर फाउंडेशन, पुणे यांच्या विद्यमाने आखण्यात आली. सर्व गिर्यारोहकांनी आपली नावनोंदणी करून कसुन तयारीही केलेली. सर्वजण पुण्यात जमून रात्री आम्ही किल्ला लिंगाणाकडे प्रस्थान केले. या मोहिमेत पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 45 गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. पुण्याहून लिंगाणा किल्ला जेमतेम 88 कि.मी म्हणजे 3 तासांचा प्रवास होता.

सर्वांनी या तीन तासात आपआपली ओळख करून घेतली. मोहीम प्रमुख, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखेे, शिवाजी आंधळे, विक्रांत शिंदे यांनी मोहिमेमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. सर्वांना सेफ्टी कीट वाटण्यात आले. मध्येच बसने जाताना सिंगापुर 10 कि.मी.अंतरावर असा फलक दिसला आणि खरच मन भारावून गेले. कारण हे सिंगापुर परदेशातील सिंगापुरपेक्षा तसूभरही कमी नव्हते..कारण छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत असलेले आणि निसर्गाने बहरून गेलेले हे गाव आहे. पुढे आम्ही मोहरी गावात पोहोचलो, तिथे उतरून सर्वांनी सुरक्षासाहित्य परिधान करून,आणि लागणारे साहित्य, खाद्यपदार्थ घेऊन लिंगाणाच्या दिशेने कूच केली. प्रत्येक तुकडी बरोबर तुकडी प्रमुखाची नेमणूक करण्यात आली.

मनात काही भीती नव्हती कारण लिंगाणा दिसून येत नव्हता, आम्ही रात्री 2 वाजता मोहिमेस सुरवात केली, लिंगाणा आमच्या नजरा लपवून थंड वार्‍यावर झोप घेत आहे, असे भासत होते. मोहरी गावापासून 30 मिनिटाच्या वाटेनंतर सुरू होते ती बोराट्याची नाळ. एकदम भयाण कातळ विखुरलेला अशी बोराट्याची नाळ. घनदाट काळोख, भयानक शांतता, रातकिड्याची किरकिर आणि मध्येच येणारा पक्ष्यांचा आवाज. जणू काही आमचे स्वागतच करत होते.. भलेमोठे कातळ… आमचे पाय चुकवत होते. बोराट्याची नाळ उतरायला बॅटरी म्हणजेच आधुनिक काळातील मशाल आम्हाला साथ देत होती. खूपच अवघड अशी उतरण आहे ही… पूर्वीच्या काळात लोक याच नाळद्वारे रायगड आणि पुणे या ठिकाणाकडे ये जा करत असत. दीड तासाच्या उतरणीनंतर आम्ही साधारण पहाटे साडेपाचच्या सुमारास लिंगाणाचा पायथा गाठला.

थंड वारा भोवती गोँगावत होता.. पाण्याच्या धबधब्याच्या आवाजासारखा वारा आम्हाला घाबरवत होता.. खरच आज भीती जाणवली होती वार्‍याची.. वारा आम्हांवर आदळत होता.. निवडलेल्या सर्व स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख निभावत व्यवस्थितरित्या रोप किल्ल्यावर आखून घेतले. काळोख असतानाच आम्ही लिंगाणा चढण सुरू केली असल्याने लिंगाण्याचे प्रखर रूप हे दिसून येत नव्हते. जाग्यावरच चढण असल्याने विविध टप्पे पार केल्यानंतरच पुढच्या चढणीचे दर्शन होत होते. सर्व गिर्यारोहक पूर्ण शर्थीने किल्ले लिंगाणाशी झुंज देत होते. गिर्यारोहकांमध्ये 80% हाताने आणि पायाने अपंग असलेला कु. धीरज कळसाईत हा अकोला जिल्ह्यातून सामील झालेला होता..त्याचप्रमाणे 12 वर्षाची चिमुरडी कु. गायत्री इंगळे ही मोहिमेत सहभागी झाली होती.

अनेक अवघड टप्पे पार करून सर्व गिर्यारोहकांनी किल्ला लिंगाणा सर केला आणि हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला.. महाराजांचा जयघोष करून मोहीम प्रमुखांनी किल्ला बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आणि आम्ही किल्ला उतरणीस लागलो. अवघ्या 2-3 तासात आम्ही किल्ला रोपच्या साहाय्याने उतरलो. पुन्हा बोराट्याची नाळ चढून आम्ही मोहरी गावाकडे प्रस्थान केले. किल्ला सर करून आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा नीतीधुरंधरपणा प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाला.. खरच वरती नेऊन सोड्लेल्या कैद्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नव्हता..म्हणूनच महाराजांनी किल्ला लिंगाणा हे कारागृह बनवले असावे.

जरी दुर्गराज रायगड असताना किल्ला लिंगाणा रौद्र ,निक्रट, रागीट रूप दाखवत असला तरी तो आलेल्या सर्वांचे चांगलेच स्वागत करतो आणि प्रेम देतो.. आणि सर्वजण या किल्ल्याच्या प्रेमात पडतात. खरतर या मोहिमेचा थरार अनुभवल्याने जिंकल्याची जाणीव होते. झुंज देऊन समोरच्यावर कशी मात करायची आणि आपला विजयाचा तुरा कसा खोवायचा हे या अवघड मोहिमेतून शिकायला मिळाले.

विशेष आभार – शिवराष्ट्र हायकर्स, कोल्हापूर आणि शिखर फाउंडेशन, पुणे.

"ling

"ling

"ling

"ling

"ling

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.