Pimpri: मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला देहूरोड येथून अटक


सव्वा वर्षापासून पोलीस होते मागावर

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरात दहशत माजविणा-या रावण टोळीतील सराईत गुन्हेगारांचा तपास करत असताना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आणि मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला गुन्हेगारी विरोधी पथकाच्या (उत्तर विभाग) पोलिसांनी देहूरोड येथे सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.5)  देहूरोड येथील इंद्रायणी हॉटेल येथे करण्यात आली.

रमेश शंकर मारकड (वय 32, रा. शेलारवाडी, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आकुर्डी येथे रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा टोळी युद्धातून खून करण्यात आला. या टोळीतील पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अक्षय प्रभाकर साबळे आणि त्याच्या इतर साथिदारांचा गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस शोध घेत होते. निगडी, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेत असताना पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि मोक्का मधील सव्वा वर्षापासून फरार असलेला आरोपी रमेश मारकड याची माहिती मिळाली. 

रमेश मारकडहा देहूरोड येथील हॉटेल इंद्रायणी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी या गुन्ह्याच्या तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 चे अधिकारी समीर शेख यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, राज देशमुख, अतुल मेंगे, किरण चोरगे, निलेश शिवतरे यांनी केली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.