पीएमपीएमएलची 50 रुपयात दैनिक पास योजना कायमस्वरूपी करण्याची मागणी

योजनेत केलेल्या मुदत वाढीचे पीएमपी प्रवासी मंचकडून स्वागत

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या ‘दैनिक पास 50 रुपये’ या योजनेमध्ये मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकदाच 50 रुपयांचे तिकीट काढून आणखी काही दिवस पीएमपीएमएलने दिवसातून कितीही वेळा आणि कुठेही फिरण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. पीएमपी प्रवास मंचने या योजनेचे स्वागत केले असून ही योजना कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात पीएमपी प्रवास मंचने म्हटले आहे की, दैनिक पास 50 रुपये ही नागरिकांच्या हिताची योजना असून, अशा योजना कायमस्वरूपी करण्यात याव्यात. त्याच प्रमाणे या योजनेची बसेस, स्थानके, माध्यमातून भरपूर प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. कारण अनेक नागरिकांपर्यंत अद्याप याची माहिती पोहोचलेली नाही. 

वाहतूक समस्या, प्रदूषण आदी बाबतीत पुण्याची वाढ दिल्लीच्या दिशेने झपाट्याने होत आहे. तेथील बस प्रवास दराचे अनुकरण केल्यास मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाढून रस्त्यावरील खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात कमी होतील, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

तसेच पत्रकातून पीएमपीएमएलच्या दर कमी करण्याचीही मागणी करण्यात आली. बस तिकीट दर किमान खालील प्रमाणे करावे – 

अ . 10 किलोमीटरसाठी 5 रुपये.

ब . 20 किलोमीटरसाठी 10 रुपये

क . पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीतील प्रवासासाठी मासिक पास 250 रुपये 

 

या प्रमाणे पीएमपीएमएलचे दर असावेत अशी अपेक्षा पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे यतिश देवाडिगा यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.