लग्नाच्या खर्चात कपात करून घेतले रायगड परिसरातील 50 मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व

एमपीसी न्यूज – लग्नासारख्या विविध सण-समारंभांकरिता खर्च करण्यासाठी अनेकांकडे पैसे असतात. परंतु गरजूंना मदतीचा हात देण्याकरिता त्यातील मोजकेच पुढाकार घेतात. आज तावरे दाम्पत्याने त्यांचा संसार सुरू करतानाच निरंजन सेवाभावी संस्थेच्या प्रेरणेतून शिवछत्रपतींच्या रायगड किल्ले परिसरातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी उचलले पाऊल युवा पिढीसमोर आदर्श ठरले आहे. आम्ही शिवछत्रपतींच्या रक्ताचे वारस असलो, तरी अशा कार्यांमधून शिवरायांचे नवे वारस तयार होत आहेत, असे मत खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे रायगड परिसरातील विद्यार्थ्यांचे पालकत्त्व स्वीकारले आहे. त्या उपक्रमाला हातभार लावत संस्थेचे विराज तावरे आणि केतकी तावरे यांनी आपले लग्न साध्या पद्धतीने केले आणि रायगड परिसरातील गरजू मुलांच्या शिक्षणाकरिता 2 लाख रुपयांची रक्कम तावरे कुटुंबाने निरंजन संस्थेकडे सुपूर्द केली. म्हात्रे पूल येथील कृष्णसुंदर लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमाला विनायक निम्हण, विकास पासलकर, न्यायाधिश उमेशचंद्र मोरे, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, सचिव सचिन मिणीयार आदी उपस्थित होते.   

छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, अनेकांना केवळ भाषणाची सवय असते. परंतु या नवदाम्पत्याने शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत केलेले काम कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येकाने गरजू घटकांकरिता काम करण्याकरिता पुढे यायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण काम केल्यास समाजपरिवर्तन नक्की घडेल. त्याकरिता लोकांनी एकत्र येत अशा सामाजिक कामांतून प्रेरणा घ्यायला हवी.

विराज तावरे म्हणाले की, आजच्या काळात लग्न म्हटले की एवढे तोळे सोने, महागडे डेकोरेशन, जेवणावळी, लग्नाचा बस्ता, असे भव्य दिव्य होत असते. समाजात अशा प्रकारे आपली पत सांभाळण्याकरिता कर्जबाजारी झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. त्या परंपरेला छेद देत लग्नसमारंभावर होणारा अनावश्यक खर्च टाळून शिवछत्रपतींच्या रायगड किल्ल्याच्या परिसरातील गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व आम्ही घेतले. यापुढेही प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.