Pimpri : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा दुचाक्या जळून खाक ; आगीमध्ये 5 ते 6 रहिवासी जखमी(व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किट झाल्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सहा दुचाक्या जळून खाक झाल्या. या घटनेत एक ज्येष्ठ महिला आणि 5 ते 6 रहिवासी जखमी झाले. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास पिंपरीच्या मिलिंदनगर येथे कपिला वास्तू सोसायटीमध्ये घडली. या आगीची तीव्रता इतकी होती की आगीची झळ चौथ्या मजल्यापर्यंत बसली.

भागाबाई धर्मा गायकवाड (वय 70), काका कांबळे, श्रीकांत कांबळे, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अग्निशमन विभागाला पहाटे सव्वाचार वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही आग विझविण्याचा प्रयत्नात सोसायटीमधील एका ज्येष्ठ महिलेसह पाच ते सहा जण होरपळले. या आगीची तीव्रता इतकी होती की आगीची झळ चौथ्या मजल्यापर्यंत बसली. या मजल्याच्या गॅलरीमध्ये ठेवलेले कपडे, कुंड्यातील रोपे जाळून खाक झाली. दुचाकींसह कपडे आणि घरातील साहित्य असे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, अज्ञात आरोपींनी गाड्या पेटवून दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर इलेक्ट्रिक वायरचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.