Pimpri : वाढीव दराच्या नावाखाली कोट्यवधीची लूट; ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहरातील रस्ते विकास कामात मूळ अंदाजीत खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केवळ रस्त्यांचीच दुरवस्था असल्याचा आभास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाणीवपुर्वक निर्माण केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि रस्ते विकास यांवरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात एक हजार 70 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील 874.14 किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम आणि वेगवान करण्याकरिता बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) विकसित करण्यात येत आहे. तरीदेखील आयुक्तांनी ‘एकच ध्यास रस्ते विकास’ हे पालुपद कायम ठेवले आहे.

शहरातील रस्त्याच्या कामाच्या निविदा ठेकेदारांकडून वाढीव दराच्या भरल्या जात आहेत. आयुक्त देखील त्यांना वाढीव दराची कंत्राटे बहाल करत आहेत. तसेच विविध विकासकामांच्या खर्चात वाढ होत आहे. वाढीव खर्चाचे विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत. अशा पद्धतीने शहरातील रस्ते विकासकामात मूळ अंदाजीत खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, संगणमत करुण कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषन विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.