Pune : ‘भारतीयम 2019’ :वार्षिक ,राष्ट्रीय टेक फेस्टचे उदघाटन

केंद्राच्या सॉफ्टवेअर पार्कच्या वतीने देशात 28 ठिकाणी 'एक्सलन्स सेंटर्स ' उघडणार

एमपीसी न्यूज- केंद्राच्या सॉफ्टवेअर पार्कच्या वतीने देशात 28 ठिकाणी ‘एक्सलन्स सेंटर्स ‘ उघडणार असल्याची माहिती ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस ऑफ इंडिया ‘या केंद्रीय माहिती -तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागाचे महाराष्ट्र -गोवा संचालक संजय गुप्ता यांनी दिली. भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘भारतीयम 2019’ या वार्षिक, राष्ट्रीय पातळीवरील टेक फेस्टच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या टेक फेस्टचे उदघाटन धनकवडी कॅम्पसमध्ये झाले. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आनंद भालेराव होते . सी -टेक इंजिनिअर्स प्रा लि चे संचालक अविनाश चाबुकस्वार हे पाहुणे म्हणून उपस्थित होते .

भारतीयम -2019′ मध्ये एकाच ठिकाणी 19 विविध प्रकारचे तंत्रविषयक कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले आहेत. त्यात हॅकेथॉन, प्रकल्प प्रदर्शन, पेपर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, गटचर्चा यांचा त्यात समावेश आहे .

संजय गुप्ता म्हणाले ,”आधुनिक तंत्रज्ञानाला वाव मिळून रोजगारवृद्धी व्हावी हे केंद्र सरकारचे धोरण आहे. इंटरनेट ऑन थिंग्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाउड, ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्चुअल रिअलिटी, ब्लॉक चेन या अत्याधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केंद्राच्या सॉफ्टवेअर पार्कच्या वतीने देशात 28 ठिकाणी ‘ सेंटर ऑफ एक्सलन्स’ उघडली जाणार आहेत. त्यातून स्टार्ट अप्स आणि नव्या उद्योजकांना मदत होईल. यासाठी राज्य सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योगक्षेत्र यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. भविष्यातील ही आव्हाने लक्षात घेऊन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी तयार व्हावे”

“भारतात 167 अब्ज डॉलर्स व्यवसाय असलेला माहिती-तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला आहे. मात्र सॉफटवेअर प्रॉडक्ट्स तयार करण्याचा उद्योग 7 अब्ज डॉलर्स इतकाच आहे. ते वाढविण्याचे केंद्राचे धोरण आहे. त्यातून सॉफटवेअर प्रॉडक्ट्स निर्मितीचा उद्योग 7 अब्ज डॉलर्स वरून 80 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल. साडेतीन दशलक्ष रोजगार निर्माण होतील. यामध्ये ही ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सहाय्य्यकारी ठरतील”

डॉ. आनंद भालेराव म्हणाले, “भविष्यातील आव्हानांना कल्पक उत्तरे शोधणारे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. विद्यार्थ्यांनी प्रचलित ज्ञानालाही आव्हान देऊन नवे शोध लावावेत” महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. संदीप वांजळे यांनी आभार मानले .

प्रवीण भामरे, मुकुल जोशी, गिरीश बिडानी, बख्तियार खान, संतोष ओसवाल, रवी वर्मा हे विविध कंपन्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.