Pimpri : लोकलच्या रोजच्या विलंबामुळे चाकरमान्यांचे हाल

एमपीसी न्यूज – वेळापत्रकानुसार सकाळी सव्वाआठला लोणावळा रेल्वे स्थानकावरून निघणारी लोकल पावणेदहा वाजता पुणे स्थानकावर पोहोचते. मात्र, प्रत्यक्षात ही लोकल सकाळी सव्वाआठला लोणावळा स्थानकावरून निघून दहा ते साडेदहाच्या दरम्यान पुणे स्थानकावर पोहोचत आहे. दररोज, ही लोकल किमान अर्धा तास उशिरा धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कामावर उशिरा पोहोचल्याने अनेकांचा मागील काही दिवसांपासून ‘हाफ डे’ लागला आहे. यामुळे लोकलच्या नियमित प्रवाशांनी आज (शुक्रवारी) सकाळी लोकलमध्ये आक्रोश करत मोटरमनशी हुज्जत घातली.

लोणावळा रेल्वे स्थानकावरून सकाळी 8.20 वाजता सुटणारी लोकल (99807) पुणे स्थानकावर सकाळी 9.45 वाजता पोहोचते. मात्र, ही लोकल मागील एक महिन्यापासून दररोज किमान अर्धा तास उशिरा पोहोचत आहे. इंटरसिटी एक्सप्रेसला डबल इंजिनची ट्रायल घेणे सुरु असल्याने ही लोकल देहूरोड, चिंचवड तसेच खडकी येथे थांबवली जाते. यामुळे लोकल पुणे स्थानकावर उशिरा पोहोचते. आज ही लोकल चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, खडकी या स्थानकांवर बराच वेळ थांबली. पिंपरी स्थानकावर लोकल तब्बल 18 मिनिटे थांबली. पिंपरी स्थानकावर रेल्वे क्रॉस करण्याची व्यवस्था नसतानाही हा जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.

लोकलचे नियमित प्रवासी मॉन्टी जैन म्हणाले, “मागील एक महिन्यापासून लोकल उशिरा धावत आहे. अनेक कामगारांना सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचावे लागते. मात्र लोकल उशिरा पोहोचल्याने कामगारांना वेळेत पोहोचता येत नाही. यामुळे त्या कामगारांचा दररोज अर्ध्या दिवसाचा पगार कापला जात आहे. रोज-रोज हाफ डे घेऊन कामगार आता कंटाळले आहेत. याबाबत भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार केली. प्रत्यक्ष पुणे रेल्वे स्थानक व्यवस्थापकांची भेट घेतली. तरीही ही लोकल उशिराच धावत आहे”

आज (शुक्रवारी) सकाळी सवयीप्रमाणे लोकल उशिरा धावत होती. चिंचवड रेल्वे स्थानकावर तिला थांबवून इंटरसिटी गाडी सोडण्यात आली. त्यानंतर लोकल पिंपरी स्थानकावर आली असता लोकलच्या मोटरमनने वेगात लोकल सुरु केली. यामुळे अनेक नागरिकांना लोकलमध्ये चढता आले नाही. बराच वेळ वाट पाहून चढता न आल्याने अनेकांची लोकल सुटली. लोकलमध्ये गर्दी ही नित्याचीच बाब आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाला कसलीही काळजी नाही, असेही जैन म्हणाले.

आणखी एक प्रवासी म्हणाले, “नियमित लोकलने प्रवास करणारे नागरिक रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पार मेटाकुटीला आले आहेत. प्रत्येक किलोमीटरवर सिग्नलिंग करण्यात आले आहे. यामुळे लोकल आणि अन्य रेल्वे वेळेत पोहोचतील. तसेच काही गाड्या वेळेपेक्षा लवकर पोहोचू शकतील, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की, ज्या लोकल वेळेत पोहोचायला हव्यात, त्याही उशिरा धावत आहेत. सायंकाळी सहा वाजता पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल (99826) मध्येच थांबवली जाते. केवळ रेल्वेच्या ढासळलेल्या नियोजनामुळे घरातून सकाळी लवकर निघालेला कामगारवर्ग रात्री सुद्धा उशिराच पोहोचत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.