Pimpri : आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करणार – देवेंद्र तायडे

एमपीसी न्यूज –  वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत देईल ते उमेदवार विजयी करण्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.

भारिप बहुजन महासंघ पिंपरी -चिंचवड शहर यांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रानुसार, पिंपरी विधानसभा समन्वय समिती तयार करण्यासाठी वल्लभनगर येथील मंगलसेन बहल विरंगुळा केंद्राच्या सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भारिप बहुजन महासंघाचे महासचिव सुहास देशमुख, रहीम सय्यद, प्रवक्ता के. डी. वाघमारे, उपाध्यक्ष आजीनाथ सकट, ओबीसी संघाचे सुरेश गायकवाड, परीट समाजाचे राजकुमार परदेशी, धनगर समाजाचे अजित चौगुले आदी उपस्थित होते.

या बैठकीला मार्गदर्शन करताना भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी जाहीर केली असून लवकरच वंचित बहुजन आघाडीची जिल्हा व शहर कार्यकारिणी देखील जाहीर होईल. याचाच भाग म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रांमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन केले असून चिंचवड येथील मेळाव्यास शिक्षण परिषद, भोसरी येथील मेळाव्यास आरोग्य परिषद तर पिंपरी येथील मेळाव्यास पाणी परिषद असे नाव देण्यात आले आहे.

संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ हे या परिषदेस मार्गदर्शन करतील तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रानुसार पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा क्षेत्रात स्थापन करण्यात येणाऱ्या विधानसभा समन्वय समितीसाठी त्या त्या विधानसभा क्षेत्रांमध्ये बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभा समन्वय समिती तयार करण्यासाठी आजची बैठक आहे. या बैठकांमधून तयार करण्यात येणाऱ्या समन्वय समितीच्या माध्यमातून नियोजित भव्य मेळाव्याचे (परिषदांचे) आयोजन करण्यात येणार आहे. विधानसभा समन्वय समिती ही विधानसभा क्षेत्रांमध्ये संघटन करणे, प्रसार, प्रचार संबंधी चर्चा करणे व बुथ कमिटी तयार करण्याचे काम देखील करणार आहे. ज्यामध्ये ५०% बौद्ध व ५०% इतर अति वंचित समूह घटकांना स्थान असेल अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवडचे खजिनदार राजेश बारसागडे, उपाध्यक्ष राहुल इनकर, बबन सरोदे, अतुल भोसले, राजू ससाणे, रामा भाऊ कुव्हारे, राजेंद्र साळवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.