Hinjawadi : दारू न दिल्याने हॉटेलमध्ये राडा घालणारा पोलीस निलंबित
एमपीसी न्यूज – दारु न दिल्याचा राग आल्याने पुणे शहर पोलीस दलातील एका मद्यधुंद पोलीस शिपायाने तोडफोड करत हॉटेलमध्ये राडा घातला. राडा घालणा-या पोलीस कर्मचा-याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. तसेच त्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
अक्षय मोहन धुमाळ (वय 24, रा. भवानीपेठ पुणे) असे निलंबित झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याचे सहकारी अजय विजय खोत (वय 28), मंगेश महेंद रोकडे (वय 31), जयंत बालमुकुंद साळुंके (वय 29, सर्व रा. पोलीस वसाहत, भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमालक रामकिसन रमेश खैरनार (वय 32, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय धुमाळ हा पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीस आहे. रविवारी (दि. 4) मध्यरात्री एकच्या सुमारास अक्षय त्याच्या तीन साथीदारांना घेऊन हिंजवडी येथे आला. ‘आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणासाला त्या दिवशी दारु का दिली नाही’, असे म्हणून त्यांनी रामकिसन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी धुमाळ यांना अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे घेत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर धुमाळ याने पार्क केलेल्या दुचाकींना लाथा मारल्या. तसेच चायनीज दुकानाची काच देखील फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घडलेल्या प्रकाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत धुमाळ याच्या तीन साथीदारांना अटक केली. दरम्यान, धुमाळ फरार झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.