Dehuroad : इसमाला मारहाण करून हजारोंचा ऐवज हिसकावल्याप्रकरणी एकाला अटक
एमपीसी न्यूज – देहूरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर सहा जणांनी मिळून एका इसमाला मारहाण करून लुटले. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री घडली.
अनुराग नागेश तेलगू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत आकाश पिल्ले, शे-या अडागळे, दिनेश व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल दादाराव शिंदे (वय 32, रा. आकुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी विशाल यांना देहूरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाठले. त्यांना मारहाण केली. तसेच रेल्वे स्टेशनच्या आत नेऊन त्यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 450 रुपये रोख रक्कम आणि कागदपत्रे असा एकूण 7 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.