Talegaon Dabhade : खताच्या पोत्यात सापडले ‘त्या’ अर्ध्या मृतदेहाचे डोके नसलेले धड

एमपीसी न्यूज – ओढ्याच्या कडेला खताच्या पोत्यात घालून एका व्यक्तीचा कमरेपासून पायाचा भाग मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात सापडला. त्यानंतर बुधवारी (दि. 19) रात्री साडेसातच्या सुमारास साळूंब्रे गावाजवळ पांढ-या रंगाच्या खताच्या पोत्यात धड सापडले. मात्र, धडावरून डोके गायब आहे. त्यामुळे तीन भागात विभागलेल्या या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान तयार झाले आहे.

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास शिरगाव-कासारसाई रोडवर साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात पांढ-या खताच्या पोत्यात एक पुरुष जातीचा 35 ते 40 वयाचा अर्धवट कमरेपासून पायाचा भाग सापडला. दोन्ही पाय कॉटनच्या हिरव्या रंगाच्या साडीने बांधलेले होते. बुधवारी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर, बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास साळूंब्रे गावाजवळ शरीराचे फक्त धड सापडले. त्या धडाला डोके आणि पाय नव्हते. हे धड देखील खताच्या पांढऱ्या पोत्यातच आढळून आले आहे. मंगळवारी रात्री आढळलेल्या अर्ध्या मृतदेहाचे हे धड असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, या धडाला डोके नसल्याने पोलीस पुन्हा चक्रावून गेले आहेत. एका व्यक्तीचा खून करून तीन भागात कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.