Pune: पुणे महापालिकेत 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ; 12 पॉझिटिव्ह

Pune Municipal Corporation's 100 employees' corona test, 12 positive.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. बुधवारी महापालिकेत 100 कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन किटद्वारे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांना तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

महापालिकेत आणखी अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील 2 शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिका कोरोनाचे हॉटस्पॉट झाली आहे.

महापौर, विरोधी पक्षनेत्या, 7 ते 8 नगरसेवक आणि त्यांचे नातलग, जवळपास 250 कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर आणि विरोधी पक्षनेत्या आणि नगरसेवकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

सध्या महापालिकेत सामान्य नागरिक आणि ठेकेदारांना बंदी घातली आहे. पुणे शहरात आता कोरोनाचे 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत.

16 हजार 269 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रोज 7 हजारांच्या आसपास चाचण्या होत असल्याने 1700 ते 1800 रुग्णांची नव्याने भर पडत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार 10 दिवसांचा लॉकडाऊन गुरुवारी समाप्त होत आहे. या कालावधीत कोरोनाची साखळी कमी होण्याऐवजी वाढतच गेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.