Chinchwad Crime News : बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून बेड्या; 13 बुलेटसह 15 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 लाख 50 हजारांच्या 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

विशाल बाळासाहेब मगर (वय 20, रा. लेहणेवाडी, ता जामखेड, जि. अहमदनगर), विशाल बंकट खैरे (वय 21, रा. भुतडाता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा मुख्य साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. घाटकोपर, मुंबई) याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक कालावधीत अनेकांनी सहज पैसे मिळविण्यासाठी चोरीच्या गुन्ह्याकडे वळले. त्यावर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढण्यास सुरुवात केली. वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरील परीसरातील सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल शिवाजी ढोबळे घाटकोपर मुंबई हा बुलेट मोटर सायकल चोरी करीत असल्याचे आढळले. अमोल याने चोरलेली एक बुलेट दुचाकी विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परीसरामध्ये येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 24) पोलिसांनी मोशी टोलनाक्यावर सापळा लावला. पोलिसांनी आरोपी मगर आणि खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. अधिक तपास केला असता ती बुलेट मोटर सायकल त्यांचा मित्र अमोल ढोबळे याने चोरी करुन त्यांना विक्रीसाठी दिली.

अमोल ढोबळे याने 12 बुलेट मोटर सायकल व इतर दोन मोटर सायकल जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परीसरातून चोरुन आणून विक्रीसाठी ठेवलेल्या 13 बुलेट मोटर सायकल व एक अपाची मोटर सायकल, एक अॅक्टीवा मोपेड अशा एकूण 20 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 15 मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.

याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस ठाणे 2, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे 2, भोसरी पोलीस ठाणे 1, पिंपरी पोलीस ठाणे 1, हिंजवडी पोलीस ठाणे 1, पुणे ग्रामीण हददीतील राजगड पोलीस ठाणे 2, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हददीतील नेरळ पोलीस ठाणे 1, एपीएमसी पोलीस ठाणे 1, रबाळे पोलीस ठाणे 1, ठाणे शहर हददीतील कापुरबावडी पोलीस ठाणे 1 येथे गुन्हे दाखल आहेत.

बुलेट मोटर सायकल चोरीतील अमोल शिवाजी ढोबळे याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी विशाल बाळासाहेब मगर याच्यावर यापूर्वी जामखेड येथे फायरींग करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मागील वर्षी दाखल आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन तपास करण्यात येत असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. या कामगिरी बद्दल गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील तीन अधिकाऱ्यांना प्रशंसा पत्र देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर पोलीस उप निरीक्षक प्रसन्न ज-हाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, हजरत पठाण, यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, नाथा केकान, राजकुमार हनमंते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, प्रमोद ढाकणे, जगदीश बुधवंत, गजानन आगलावे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.