Pimpri News: चारचाकी वाहनातून सहकुटुंब प्रवास करताना मास्कची गरज नाही

कुटुंबाव्यतिरिक्त वाहनचालकाला मास्क वापरणे बंधनकारक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा आलेख उतरणीस आला आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या नियमांमधूनही सवलत मिळू लागली आहे. चारचाकी वाहनातून सहकुटुंब प्रवास करताना आता मास्कची आवश्यकता नाही. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती, चालक कुटुंबातीलच असाव्यात. अन्य वाहनचालक असल्यास मास्क वापरणे बंधनकारक आहे.

याबाबतचे आदेश प्रभारी आयुक्त सुहास दिवसे यांनी काढले आहेत. कोरोना काळात मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमातूनही सवलत मिळत आहे. वाहनातून प्रवास करताना मास्क घालण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. मात्र, ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच वाहचालक यांना लागू आहे.

कुटुंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहनचालक, अथवा अन्य व्यक्ती एकत्रित प्रवास करत असतील, तर मास्कचा वापरण बंधनकारक राहील, असे प्रभारी आयुक्तांच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.