Pimpri Corona News : लसीकरण केंद्रांवर ‘एनसीसी’चे कॅडेट पुरविणार सुरक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर आता एनसीसीचे कॅडेट महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणार आहेत. यासाठी पुणे येथील एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून सुमारे 100 एनसीसी कॅडेट स्वयंसेवक आणि 14 प्रशिक्षक आपली सेवा देणार आहेत.

याबाबतची माहिती महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी दिली. महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती संख्या पाहता तसेच कोरोना संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली. महापालिका आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर या दोन संस्थांमध्ये सुरक्षा यंत्रणेतील सहकार्याबाबत चर्चा झाली.

आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय सेनेचे अधिकारी ब्रिगेडियर सुनील लिमये आणि कर्नल विनायक चव्हाण यांच्या पुढाकाराने एनसीसी योगदान या संकल्पनेतून महापालिकेकरिता एन.सी.सी. कॅडेट स्वयंसेवक नियुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका परिसरामध्ये कार्यान्वित असणा-या कोविड लसीकरण केंद्रांवर प्रथमच अशा प्रकारची नियुक्ती करण्यात आली आहे.

याकामी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या एनसीसी कॅडेट स्वयंसेवक आणि प्रशिक्षकांना कोविड लसीकरण केंद्रांवर ने-आण करण्यासाठी पीएमपीएमएलच्या स्वतंत्र बसेसची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

तसेच नियुक्त करण्यात आलेल्या कॅडेट स्वयंसेवक आणि प्रशिक्षक यांना महापालिकेच्या वतीने कोविड सुरक्षा विषयक सामुग्री पुरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.