Maval News : मागील दीड वर्षांत आठ शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई; महाविकास आघाडीकडून वसुलीचे टार्गेट – बाळा भेगडे 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गेल्या दीड वर्षात लाचलुचपत विभागाने आठ शासकीय अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडून कारवाई केलेली आहे. या अधिकाऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडीने वसुलीचे टार्गेट दिल्याने हे सर्वकाही घडले आहे, असा संतप्त सवाल माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी गुरुवारी (दि 3) पत्रकार परिषदेत केला.

वडगाव मावळ पंचायत समितीच्या सभागृहातील पत्रकार परिषदेमध्ये माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी महाविकास आघाडीवर कठोर टीका केली. महाविकास आघाडीने दिलेल्या टार्गेटमुळे अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असून यामुळेच मावळच्या ‘अस्मितेला’ धक्का बसला असल्याचे राज्यमंत्री भेगडे यावेळी म्हणाले.

मावळ तालुक्यातील सरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आणि लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आपल्या कामासाठी कार्यालयामध्ये नेमलेल्या एजंट- दलाल यांचा आधार घ्यावा लागतो तर आपल्या कामासाठी हेलपाटे, लाच द्यावी लागते, असा गंभीर आरोप करून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या प्रवृत्तींना निश्चित आळा घालतील असा विश्वास देखील भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ तालुक्यातील प्रशासनावर कोणाचाच धाक व अंकुश नसल्याने काही अधिकारी संगनमत करुन मोठमोठ्या आर्थिक उलाढाली करीत आहेत. आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक शासकीय कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी जागृत राहणार असल्याचे सूतोवाच भेगडे यांनी केले.

लाचखोरीच्या घटना आणि अधिका-यांना दिलेल्या टार्गेटमुळे मावळच्या जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक, येणारे नवीन उद्योग, वाढणारे नागरीकरण यावर याचा दुरगामी परिणाम होणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. तसेच फसवणूक, खोटे जमीन व्यवहार, गुन्हेगारीकरण, कंपन्यांमध्ये होणारे दबावतंत्र, काम मिळविण्यासाठी खोटेनाटे दबावाचे राजकारण यामुळे तालुक्यातील सर्वच वातावरण अशांत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले

या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, मावळच्या सभापती निकिता घोटकुले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी तालुका अध्यक्ष अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण, पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे, सुवर्णा कुंभार, अलका धानिवले, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे व नगरसेविका अर्चना म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.