Pune – पु. ल. देशपांडे उद्यानात साकारणार ‘कलाग्राम’

एमपीसी न्यूज – देशभरातील विविध राज्यांच्या लोककला आणि ग्रामीण कलाकृतींची प्रात्यक्षिके पुणेकरांना एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानात ‘कलाग्राम’ साकारण्यात येणार आहे. यासाठीच्या ५६ लाख ३५ हजार ४११ रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. साडेतीन एकरवर हे कालाग्राम उभारले जाणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथे असलेल्या ३३ एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. उद्यानामध्ये पुलंच्या इच्छेनुसार जपान शैलीचे गार्डन, मोगल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन करण्यात आले होते. नियोजनाप्रमाणे उद्यानात जपानी आणि मुघल शैलीचे गार्डन साकारण्यात आले आहे. याचे उद्घाटन १९ जानेवारी २००६ रोजी झाले. मात्र निधी अभावी ‘कलाग्राम’चे काम अद्यापही सुरू झाले नाही.

कलाग्राममध्ये बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंच्या प्रदर्शनासाठी आणि हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, लहान थिएटर बांधले जाणार आहेत. या कलाग्रामच्या कामासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा केल्या . यापैकी मे. मंगलमूर्ती डेव्हलपर्स यांची निविदा २४.८६ टक्के कमी दराने ७४ लाख ९९ हजार ८८२ रुपये एवढी आल्याने वा ठेकेदाराकडून ६ लाख ३५ हजार ४११ रुपयांचे काम करून घेण्यास आणि ठेकेदाराशी करार करण्यास मंजुरी मागणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला एकमताने मंजुरी दिल्याचे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी सांगितले. या कलाग्रामसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी एक कोटी, तर आमदार माधुरी मिसाळ यांनी ७५ लाख रुपयांचा निंधी दिला असे  मुळिक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.