Pune : दिवाळीनंतर 1150 एमएलडी पाणी उचलू ; महापालिकेचे पाटबंधारे विभागाला पत्र

एमपीसी न्यूज- ऐन सणासुदीच्या काळात पाणीकपात केली तर नागरिकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल त्यामुळे दिवाळीनंतर 1150 एमएलडी उचलण्यास सुरवात करू असे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला लिहिले आहे. पाटबंधारे विभाग याला काय उत्तर देणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

पाटबंधारे विभागातर्फे पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्यावर बुधवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी (11 ऑक्टोबर) शहरातील पूर्व भागाला कोणतीही कल्पना न देता पाणी मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे पत्र लिहिले आहे.

दरम्यान, शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असताना देखील महापालिकेने सणासुदीचे कारण देत 1350 एमएलडी पाणी उचलणे सुरु ठेवले. वास्तविक पालिकेने कमी पाणी उचलणे अपेक्षित आहे.

दसरा, दिवाळीमध्ये पुणेकरांवर पाणीकपात लादल्यास रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र लिहून दिवाळीनंतर 1150 एमएलडी उचलण्यास सुरवात करू असे सांगितल्याने पुणेकरांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसत असले तरी पाटबंधारे विभागाच्या उत्तरावरच पुणेकरांचे हे समाधान अवलंबून असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.