Pimpri News: चंद्रकांतदादा उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाल्याने नाराज आहेत की नियंत्रण राहिले नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. आईवरुन शिव्या देणे कोल्हापूरची पद्धत आहे. नरेंद्र मोदी, अमितभाईंना शिव्या देणे सहन करु शकत नाही असे पालकमंत्री चंद्रकांतदादा म्हणतात. अहो, आपली संस्कृती, इतिहास, परंपरा काय सांगते. कोणालाच शिव्या देवू नका, दोन व्यक्तींनाच काय कोणीच कोणाला शिव्या देवू नये, शिव्या देवून काय नोकरी लागणार आहे का, असा सवाल करत उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाले म्हणून ते नाराज असतील कदाचित, किंवा त्यांचे नियंत्रण राहिले नाही हे काहीच कळेना अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांतदादांचा समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांबाबत अजित पवार यांनी आज (शनिवारी) अधिका-यांसोबत बैठक घेतली. कामांचा आढावा घेतला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, कार्याध्यक्ष श्याम लांडे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.

Bus fire near Saptashrungi Gad: नाशिकपाठोपाठ आता वणी येथेही घडली बस पेटल्याची घटना

आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना पवार म्हणाले, ”काय आता हे विनाशकाले विपरित बुद्धी म्हणायची वेळ आली. कोणालाच शिव्या देवू नका, दोन व्यक्तींनाच काय कोणीच कोणाला शिव्या देवू नये, शिव्या देवून काय नोकरी लागणार आहे, बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का, एवढ्या महत्वाच्या पदावर असणा-या व्यक्तींनी अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य करणे हे बरोबर नाही. खरोखरीच ते नाराज असतील कदाचित की उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाले म्हणून, काय त्यांचे नियंत्रण राहिले नाही की काही कळेना.

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासूनच शिंदे-फडणवीस सरकार करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर पवार म्हणाले, ”ज्यावेळी 105 जागा निवडणून येवूनही भाजपचे सरकार आले नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वखालील सरकार आल्यानंतर त्यांनी (भाजपने) कोणाला तरी सोबत घेवून आपले (भाजपचे) सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याकरिता अडीच वर्षे गेली. हे सिद्ध झाले. मोठी शक्ती, ताकद असल्याशिवाय एकनाथ शिंदे हे एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस करुच शकत नाहीत.

नाशिकच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे

नाशिकमध्ये पहाटे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तो अॅक्सीटेंड स्पॉट म्हणून ओळखला जातो. अपघात खड्यांमुळे झाला की कशामुळे याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. राज्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मृत्यूच्या नातेवाईकांना जाहीर केलेली पाच लाखांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. भरीव मदत करावी. दहीहंडीमधील गोविंदाना दहा लाखाची मदत जाहीर केली. असा भेदभाव करुन चालत नाही. या निष्पाप लोकांचा काडीचाही दोष नाही. गोविंदाचांही दोष नसतो. तो खेळाचा प्रकार आहे. पण, मदत करताना भेदभाव करु नये. कोणत्याही परिस्थितीत नाशिकच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अशाप्रकारे पुन्हा त्या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असेही पवार म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.