Thief Arrested: फिल्मी स्टाईलने सोनसाखळी चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज – धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्ह्यांची उकल केली आहे.

आकाश वजीर राठोड (वय 22, रा. मुलखेड, ता. मुळशी) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह चोरीचे दागिने घेऊन पुढे विकणारा मध्यस्थी सोमपाल नारायण सिंह (वय 31, रा. हरवर, हार्बर, डुंगारपूर, पाल, निठाउवा, राजस्थान) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी हिंजवडी फेज तीन येथे एका महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील 52 सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. यामध्ये एक जण संशयित आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असता सहायक निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित तरुण मेगापोलीस सर्कल फेज तीन येथे येणार आहे.

Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव, सागर पंडित, सोनाली ढोणे यांच्या पथकाने मेगापोलीस सर्कल येथे सापळा लावला. एक तरुण पल्सर दुचाकीवरून आला, त्याची हालचाल संशयित असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो पळून जाऊ लागला. दुचाकीस्वाराला दुचाकीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार बिश्रांत नानावत, मंगल नानावत, अमर राठोड यांच्यासोबत मिळून 14 ठिकाणी जबरी चोरी आणि दोन ठिकाणी वाहन चोरी केली असल्याचे सांगितले.

या कारवाईमध्ये 11 लाख 71 हजार रुपये किमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यात तळेगाव, रावेत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, कामशेत, चिंचवड, पिंपरी, चिखली, एमआयडीसी भोसरी, सासवड, सुपा अहमदनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी आकाश हा सोमपाल सिंह याच्या मध्यस्थीने दागिने विकत असे. सोमपाल हा राजस्थान येथून येऊन जाऊन चोरीचे दागिने विकत घेत असे.

जामिनावर सुटल्यानंतर केले चोरीचे प्रताप

आकाश हा सराईत चोरटा आहे. चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने तीन साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर येथे तब्बल 16 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा चोरटा चोरलेले दागिने राजस्थान येथील मध्यस्थीच्या मदतीने पुढे विकत असे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.