Pune News: महावितरणच्या भरारी पथकाकडून एका महिन्यात पुणे विभागातील 175 विजचोऱ्या उघडकीस

एमपीसी न्यूज- गेल्या नोव्हेंबर या एकाच महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची 175 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यात 4 प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्यावेळी भरारी पथकाने धाड टाकुन पेट्रोल पंपाची वीज चोरी उघडकीस आणलेली आहे. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकुन बायपास करून वीजचोरी करण्याची तरतुद केलेली होती. ग्राहकास 90 हजार 179 युनिटचे रू. 19 लाख 42 हजार 182 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील 80 केडब्ल्यु जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात आली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल.टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. सदर ग्राहकांनी 80 हजार 438 युनिटसची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना 28 लाख 14 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

तिसऱ्या प्रकरणात कोल्हापुर मधील इचलकरंजी भागातील 91 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकांच्या वीज चोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले व 90 हजार 208 युनिट्स चोरी केल्यामुळे त्यांना 15 लाख 21 हजार 710 रुपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

चौथ्या प्रकरणात सोलापुर मधील नातेपुते भागातील 60 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीज चोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकांना दुसऱ्या डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर वरून एल.टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना 69 हजार 555 युनिट्सची वीज चोरी केल्यामुळे 11 लाख 55 हजार 300 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

ही वीज चोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून विहित कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना सश्रम कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.