वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इमारतींची अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी केली पहाणी

एमपीसी न्यूज –  पुणे महानगरपालिकेच्या स.नं. 39 (पै) + 40 (पै) वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इमारतींची व त्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे यांनी आज (दि. 13)रोजी अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.

या गृहप्रकल्पांतील सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ३०० चौ. फुट ते ३३० चौ. फुट असून सदनिकेमध्ये हॉल, किचन, बेडरुम तसेच स्वतंत्र संडास व बाथरुमची सोय करण्यात आलेली आहे. तसेच गृहप्रकल्पामध्ये अॅल्युमिनिअम स्लायडिंग विंडो, सोलर वॉटर हीटर, दुचाकीचे पार्किंग, ऑर्गेनिक वेस्ट कन्वह्हर्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओपन स्पेसचे विकसन, अग्निशमन यंत्रणा, सांडपाणी प्रक्रिया सयंत्र, व्हेट्रीफायड टाईल्स, प्रशस्त आतील रस्ते, प्रत्येक इमारतीस पाण्याचे मीटर, पाण्याचा प्रवाह कमी करणारे साधन इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.

सदरचे गृहप्रकल्पांची कामे सुमारे  ८०% पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. यावेळेस ज्या लाभार्थ्यांना सदनिका मिळाली आहे त्या लाभार्थ्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, श्रीनिवास कंदुल, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.