Pimpri News : प्रशासकीय अधिका-यांना कायद्याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक : स्वाधीन क्षत्रिय

एमपीसी न्यूज – प्रशासनामध्ये उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता आणण्यासाठी कार्यक्षम तसेच समयोचित लोकसेवा देणे हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे प्रमुख उदिष्ट आहे. या माध्यमातून नागरिकांना प्रभावी सेवा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कटीबद्ध आहे. नागरिकांना सेवा देत असताना कायद्याची परिपूर्ण माहिती प्रशासकीय अधिका-यांना असणे आवश्यक  असल्याचे मत महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. लोकसेवा हक्क अधिनियमानुसार या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कायद्याची अंमलबजावणी प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी विविध सेवा देण्या-या विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, सुचिता पानसरे, नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, नागरिकांना सेवा देत असताना कायद्याची परिपूर्ण माहिती प्रशासकीय अधिका-यांना असणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी नागरिकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उदिष्ट आहे. पारदर्शक, गतिमान आणि कालमर्यादीत सेवा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सर्व नागरी सुविधा केंद्रांना सूचित करणे गरजेचे आहे. शिवाय सेवा हमी कायद्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे देखील आवश्यक आहे. अर्ज नामंजूर केल्यास त्याबाबतचे कारण त्या अर्जदाराला कळविले पाहिजे.

दरम्यान, मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील चिंचवड व पिंपरी येथील नागरी सुविधा केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांमार्फत देण्यात येणा-या सेवांबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.