Pimpri News : अवैध वृक्षतोड थांबवा अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार; पर्यावरणप्रेमींचा पालिकेला इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड केली जात आहे.  छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत 50 हून अधिकवेळा तक्रार केली, त्याचे पुरावे देवूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत अवैध वृक्षतोड थांबवावी. वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे पालन करावे. वृक्षतोडीऐवजी पुनर्रोपणावर भर द्यावा अशी मागणी शहरातील विविध पर्यावरणप्रेमींनी केली. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरात अवैधपणे होणारी वृक्षतोड, वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे होणारे उल्लंघन याबाबत पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी (दि.12) महापालिकेत पत्रकार परिषद घेतली. वृक्षप्रेमी रविंद्र सिन्हा, धनंजय शेडबाळे, सुर्यकांत मुथीयान, प्रशांत राऊळ, तनय पाठकर, राहुल घोलप आदी उपस्थित होते.

रविंद्र सिन्हा म्हणाले, ”शहरात अवैधवृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन कालावधीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. होर्डिंग्ज झाडावर उभारले जातात. होर्डिंग्जसाठी झाडे तोडली जातात. त्याचे पुरावे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला दिली. कारवाईचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही. झाटणीच्या नावाखाडी झाडांची कत्तल केली जात आहे. वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे पालन केले जात नाही. अर्ज, वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिका-याने स्थळाची पाहणी करणे, 30 दिवसात अहवाल देणे, हरकती सूचना मागविणे या प्रक्रियेचे पालन केले जात नाही. झाडावर पक्षाचे घरटे असेल तर पक्षी सोडून जात नाही. तोवर झाड तोडू शकत नाहीत, असा नियम आहे. पण, त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. रात्री झाडे तोडू शकत नसतानाही रात्री झाडे तोडली जातात. अवैधपद्धतीने झाड तोडल्यावर दंड, कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. झाड तोडल्यावर पंचनामा केला जात नाही. तक्रारींवर पालिककेडून कारवाई केली जात नाही”.

धनंजय शेडबाळे म्हणाले, ”जीवसृष्टीवर मानवाचे जीवन चालले आहे. पण, तीच झाडे तोडली जात आहेत. हवेतील प्रदुषणामुळे 2019 सालात 18 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अवैध वृक्षतोडी थांबली पाहिजे. कायदे, नियमांचे पालन केले पाहिजे. झाडांची छाटणी करतानाही नियमांचे पालन केले जात नाही. झाड तोडण्याऐवजी पुनर्रोपणावर भर द्यावा. महापालिकेने या नियमांचे उल्लंघन करत राहिल्यास कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल.  आंदोलन केले जाईल. तरीही महापालिकेकडून नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास कायदेशीर बाबींचा मार्ग अवलंबला जाईल. वृक्षतोडीबाबत कायदे कडक आहेत. पण, नागरिकांना ते माहिती नाहीत. त्याचा प्रशासन फायदा घेत आहे”.

प्रशांत राऊळ म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराचा नावाच पिंपरी,चिंच आणि वड या झाडांवरुन तयार झाले आहे. त्याच शहरात विनापरवाना वृक्षतोड मोठ्या प्रमाणत होत आहे. हे अतिशय वेदनादायी आहे. झाडांचे पुनर्रोपण केले जात नाही. स्मार्ट सिटीच्या दिशीने जात असताना शहराची ग्रीन सिटी ओळख पुसली जात आहे. याकडेही प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.