Pimpri News : भाजपने नऊ महिने तहकूब ठेवलेल्या यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या विषयाला प्रशासकाची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने सुमारे नऊ महिने तहकूब ठेवलेल्या शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा विषयाला प्रशासक राजेश पाटील यांनी पहिल्याच बैठकीत मान्यता दिली. या विषयामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आणि राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा होती. त्यामुळे तहकूब केला जात असल्याचे सांगितले जात होते. पण, प्रशासकाने पहिल्या बैठकीत या विषयाला मान्यता दिली.

शहरातील रस्ते, मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे कामकाजाकरिता तयार करण्यात आलेल्या निविदा आरएफपी नुसार 7 वर्षे कालावधीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्याकामी व त्यापोटी होणा-या अंदाजे 362.04 कोटी रुपयांच्या अथवा प्रत्यक्ष खर्चासदेखील प्रशासक पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली. पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते.

निविदा प्रक्रीयेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना 1 डिसेंबर 2015 ते 30 नोव्हेंबर 2017 या दोन वर्षे कालावधीसाठी कामकाज सोपविण्यात आले होते. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या संस्थांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 31 डिसेंबर 2018 रोजी संपुष्टात आल्यामुळे पुन्हा चार महिने कालावधीकरिता त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर सन 2020 मध्ये शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेज निहाय दर मागविण्यात आले. तथापि, या निविदा प्रक्रीयेमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याचे 6 जुलै 2020 रोजी निविदा रद्द करण्यात आली.

स्थायी समितीने 11 सप्टेंबर 2018 रोजी शहरातील मंडई, रस्ते आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी ‘आरएफपी’ तयार करण्यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यानुसार 18 मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स मार्फत तयार केलेला मसुदा 7 जानेवारी 2021 रोजी सादर करण्यात आला. 19 जानेवारी रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमक्ष सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये दुरूस्ती करण्याच्या सुचना सल्लागार संस्थेस देण्यात आल्या. टंडन अर्बन सोल्युशन्स यांच्यामार्फत 19 जानेवारी 2021 रोजी सुधारीत ‘आरएफपी’ मसुदा सादर करण्यात आला.

18 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली. त्यामध्ये महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूसाठी दोन पॅकेज आणि उत्तर बाजूसाठी दोन पॅकेज निश्चित करण्यात आले. पॅकेज एकसाठी 221.68 किलोमीटर, पॅकेज दोनसाठी 236.2 किलोमीटर, पॅकेज तीनसाठी 239.86 किलोमीटर आणि पॅकेज चारसाठी 230.69 किलोमीटर इतकी रस्त्याची लांबी निश्चित करण्यात आली. त्यामुळे शहरातील एकत्रित रस्त्यांची अंदाजित लांबी 928.25 किलोमीटर गृहित धरण्यात आली. यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईसाठी आरएफपीमध्ये 24 स्विपिंग मशिन, आठ हूक लोडर, चार पाण्याचे टँकर आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले.

निविदा कालावधी सात वर्षाचा निश्चित करत अंदाजे 463 कोटी 94 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. तथापि, तत्कालीन सत्ताधारी भाजपने पाच महिने हा प्रस्ताव तहकूब ठेवत 20 ऑगस्टच्या महापालिका सभेत तो दप्तरी दाखल केला. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजीच्या सभेत या विषयाने पुन्हा उचल खाल्ली. आरोग्य विभागामार्फत यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाईच्या कामकाजाकरिता नव्याने ‘आरएफपी’ तयार करावी. जुन्या ‘आरएफपी मधील 4 पॅकेज ऐवजी 2 पॅकेजमध्ये रस्त्यांची विभागणी करुन सुधारित आरएफपी मसुदा तयार करावा. तसेच खर्चामध्ये कपात करुन आणि यंत्रे आणि मनुष्यबळाची फेररचना करावी.

यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाईचा विषय प्रशासकीय मान्यतेसाठी ऑक्टोबर महिन्याच्या महापालिका सर्वसाधारण सभेपुढे सादर करावा, असे उपसूचनेत म्हटले होते. त्यानुसार, आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारित प्रस्ताव ऑक्टोबर 2021 च्या महासभेपुढे सादर केला होता. परंतु, भाजपने पुन्हा तो विषय पाच महिने तहकूब केला. 13 मार्च रोजी नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने महापालिकेवर आयुक्ताची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिलीची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) घेतली. या पहिल्याच सभेत यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या विषयाला मान्यता दिली.

नवीन ‘आरएफपी’ मसुद्यात काय म्हटलंय?

  • 18 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची दोन भागांमध्ये विभागणी
  • महापालिका मुख्यालय केंद्रबिंदू समजून दक्षिण भाग आणि उत्तर भाग अशी विभागणी
  • पॅकेज एकसाठी 331 किलोमीटर लांबीचे रस्ते निश्चित
  • पॅकेज दोनसाठी 339 किलोमीटर लांबीचे रस्ते निश्चित
  • साफसफाईजोग्या रस्त्यांची लांबी 670 किलोमीटर
  • पॅकेज एकसाठी एकूण 21 वाहनांची आवश्यकता (4 अवजड वाहने, 4 मध्यम वाहने, 8 गोबलर, 3 कॉम्पॅक्टर आणि 2 वॉटर टँकर)
  • पॅकेज दोनसाठी एकूण 21 वाहनांची आवश्यकता (4 अवजड वाहने, 4 मध्यम वाहने, 8 गोबलर, 3 कॉम्पॅक्टर आणि 2 वॉटर टँकर)
  • पॅकेज एकसाठी 191 कर्मचा-यांचे मनुष्यबळ (150 झाडूवाले, 16 चालक, 20 ऑपरेटर आणि 5 हेल्पर)
  • पॅकेज दोनसाठी 191 कर्मचा-यांचे मनुष्यबळ (150 झाडूवाले, 16 चालक, 20 ऑपरेटर आणि 5 हेल्पर)
  • निविदा कालावधी 7 वर्षे
  • अंदाजे 362 कोटी 4 लाखांचा खर्च
  • आरएफपी मसुद्यात बदलाचे अधिकार आयुक्तांना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.