Alandi : बांधकाम व्यावसायिकाकडून 37 सदनिकाधारकांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या ब्रोशरमध्ये दाखवल्याप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या नाहीत. तसेच एका सदनिकाधारकाकडून कव्हर्ड पार्किंगसाठी एक लाख रुपयांची तोंडी मागणी करून फसवणूक केली. हा प्रकार 12 डिसेंबर 2015 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधीत आळंदी येथील तनिष सावली या गृहप्रकल्पात घडली.

राजू मोहनलाल मेहता, दिलीप शांतीलाल सोलंखी, श्रेणीक परमार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी योगेश विलास शिंदे (वय 34, रा. च-होली खुर्द) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची आळंदी येथे तनिष सावली हा गृहप्रकल्प आहे. या गृहप्रकल्पात योगेश यांनी 21 लाख 25 हजार 450 रुपयांना फ्लॅट घेतला. याचा खरेदी व्यवहार दुय्यम निबंधक खेड यांच्या समोर झाला.

ठरलेली सर्व रक्कम योगेश यांनी आरोपींना दिली. खरेदी खतामध्ये दिलेल्या कव्हर्ड पार्किंग देण्याचे ठरले असताना देखील आरोपींनी योगेश यांना पार्किंग दिले नाही. तसेच कव्हर्ड पार्किंगसाठी एक लाख रुपयांची मागणी केली.

आरोपींनी गृहप्रकल्पाच्या ब्रोशरमध्ये दाखवल्याप्रमाणे गार्डन एरिया, अॅमेनिटीज स्पेस, गिझर या सुविधा पूर्ण केल्या नाहीत. काम पूर्ण न करता गृहप्रकल्पामधील 37 सदनिका धारकांची आरोपींनी फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.