Alandi Crime News : हात पाय बांधून तरुणाला टाकले इंद्रायणीत; खून प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हात पाय धाग्याने बांधून अज्ञातांनी एका तरुणाला इंद्रायणी नदीत फेकले. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजता केळगाव मधील सिद्धबेट येथे उघडकीस आली.

विनायक बाळासाहेब बोरुडे (वय 24, रा. गोरेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत केळगावचे पोलीस पाटील युवराज बबन वहिले यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगाव येथे सिद्धबेट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागील बाजूला एक उद्यान आहे. तिथे नागरिक फिरण्यासाठी जातात. सोमवारी दुपारी मंदिराच्या पाठीमागील बाजूला फिरणाऱ्या लोकांना इंद्रायणी नदीच्या पाण्यात एक व्यक्ती तरंगत असल्याचे दिसले. त्यानुसार नागरिकांनी केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले यांना याबाबत माहिती दिली.

पोलीस पाटील वहिले यांनी तात्काळ आळंदी पोलिसांना याबाबत कळवले. त्यांनतर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. त्या तरुणाचे हात पाय लाल व पिवळ्या रंगाच्या धाग्याने बांधलेल्या अवस्थेत होते. त्याचे हात पाय बांधून इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकून त्याचा खून केल्याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.