Alandi : आळंदीत भरदिवसा नऊ लाखांची घरफोडी; आरोपी पसार

एमपीसी न्यूज – आळंदी शहरात भरदिवसा घरफोडी करून तीन लाखांच्या रोख रकमेसह 30 तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी पावणेबारा ते दुपारी चार या कालावधीत सोपानजाई पार्क आळंदी येथे घडली.

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला खासगी नोकरी करतात. सोमवारी त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील लॉकरचे कुलूप हातोडीच्या साहाय्याने तोडले. लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख आणि 30 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 9 लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.