Alandi:श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांचे कडून ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ ची परिवारातील सदस्यांचा सन्मान

 एमपीसी न्यूज — श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे(Alandi) सुरू झालेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमाचे एका परिवारात रूपांतर झाले आहे. या परिवारा मार्फत देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला सदृढ तसेच वैचारिक निरोगी बनविण्यासाठी योग्य वेळी योग्य वयातील बालकांना संतांचे कार्य व विचार देण्याची गरज लक्षात घेऊन परिवाराची वाटचाल सुरू झाली आहे.
कौतुकाची बाब म्हणजे अवघ्या दोन वर्षातच श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था (Alandi)आळंदी बरोबरच खेड तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात एकूण 45 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आहे. तसेच या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याच्या दृष्टीने नियोजन व वाटचाल सुरू आहे. ज्या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे अशा शाळांकडून या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिवर्तन झाल्याने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ ची परिवाराचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या वतीने संतांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी योगदान / सेवा देणाऱ्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ ची परिवारातील संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, समन्वयक तसेच अध्यापक महाराज आदी सदस्यांचा शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारायण प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वांना माऊलींचा महाप्रसाद देण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यातील जवळपास 30 ते 35 शाळांचे प्रतिनिधी आले होते.
 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, माजी आमदार रामभाऊ मोझे, विकास गोरे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, ह भ प सुभाष महाराज गेठे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह भ प शेखर महाराज जांभूळकर तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांचे / संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अजित वडगावकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत सर्वांचे स्वागत केले व या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारा सकारात्मक बदल आणि त्यामुळे वाढणारी शालेय गुणवत्ता याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सुभाष गेठे यांनी उपक्रमाचा मूळ उद्देश व्यक्त करत योग्य वयात योग्य विचार व संस्कार दिले तर मानवतेचे नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
 योगी निरंजननाथ महाराज यांनी आपल्या मनोगतातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत प्रकाश काळे यांच्या कल्पनेतील व अजित वडगावकर यांच्या समन्वयातून लावलेल्या ‘ श्री ज्ञानेश्वरी’ची या रोपट्याचा वेल राज्य किंवा देशच नव्हे तर विदेशामध्ये याचा गंध पसरल्याशिवाय राहणार नाही असे विचार व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या कार्याच्या पालकत्वाची संधी संस्थांनला मिळाली हे आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले व याचा अभ्यासक्रम लवकरात लवकर प्रकाशित करू असेही सांगितले.
नंतर प्रकाश काळे यांनी हे सर्व कार्य माउलींचे असून हे संतांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आपण एक माध्यम बनून कार्य करत असल्याचे सांगितले. हे कार्य यशस्वीरित्या सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
 कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र उमाप यांनी हे कार्य खूप मोठे असून या संतांच्या विचारांचा प्रचार – प्रसार करण्यासाठी संस्थान सर्वोत्तोपरी सहकार्य करण्यास बांधील असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश महाराज बागडे यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार अर्जुन मेदनकर यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.