Alandi : पामरांच्या उद्धारासाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार – ह भ प नामदास महाराज

एमपीसी न्यूज – आज  दि.11 डिसेंबर रोजी आळंदीमध्ये ( Alandi) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याकरीता बहुसंख्य वारकरी भाविक आले होते. इंद्रायणी काठ ,प्रदक्षिणा रस्ता वारकऱ्यांनी फुलुन गेला होता.

 

संजीवन समाधी सोहळ्यात  ह भ प नामदास महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.यात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र सांगताना त्यांच्या माता पित्यांचे देहांत प्रायश्चित्त वर्णन ,ज्ञानेश्वर महाराजांना व भावंडांना  झालेला दुर्जनांचा त्रास , संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यामुखी बोलविलेले वेद व भिंत चालवल्याचे वर्णन , सच्छिदानंद बाबा ,भगवत् गीता टीका ,ज्ञानेश्वरी माहिती, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर भेट संत नामदेव यांना  तीर्थयात्रेला नेण्याकरिता झालेले भगवान विठ्ठलाशी संभाषण याचे वर्णन,संजीवन समाधी करिता माऊलींचे विठ्ठलाशी संभाषण व संजीवन समाधीचे वर्णन केले.

 

 

तसेच कीर्तनाच्या मध्यंतरात  संत ज्ञानेश्वर महाराज अवतार जगाच्या कल्याणासाठी घेतल्याचे सांगितले. पामरांच्या उद्धारासाठी, अज्ञानी जीवांच्या उपकारासाठी,तुमच्या आमच्या उद्धरासाठी त्यांनी अवतार घेतला व ब्रम्ह स्वरूपाचे वर्णन केले.

 

देवाचे चिंतन व देव मान्य संतांचे चिंतनाने उद्धार होतो असे त्यांनी सांगितले. निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान व मुक्ताई नाम जपाचे महत्त्व तसेच सर्व संत नाम जप महत्त्व त्याची माहिती दिली.सरते शेवटी अलंकापुरी गाव माहिती,(जुनाट शिवपीठ,ज्ञानाई मुकुट)शिव शंकर,पार्वती,गणपती ,नंदी अलंकापुरी मध्ये आल्यावर शंकराने येथे काय केले व शंकर – पार्वतीच्या संभाषणाचे  व ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे वर्णन केले.

 

समाधी वर्णनावेळी  कीर्तनकार ह भ प नामदास महाराज व अनेक वारकरी भाविकांच्या डोळ्यां मध्ये अश्रू आले.समाधी सोहळ्याचे थेट मनाच्या अंतःकरणाला भिडणारे भावुक असे वर्णन ह भ प नामदास महाराजांनी किर्तनात  केले. त्यांनंतर घंटानाद झाला. माऊलींच्या समाधीवर  पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

माऊली माऊली नामाच्या जयघोषाने यावेळी मंदिर व परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी विश्वस्त विकास ढगे,विश्वस्त योगी निरंजन नाथ,विश्वस्त राजेंद्र उमाप ,विश्वस्त भावार्थ देखणे ,आळंदी ग्रामस्थ,देवस्थान मानकरी,कर्मचारी व बहु संख्येने भाविक भक्त मंदिरात उपस्थित ( Alandi)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.