Pimpri: दिलासादायक ! कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या संपर्कात आलेले 42 डॉक्टर निगेटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरीतील एका  खासगी रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या  42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला  असून,  भीतीचे वातावरण कमी झाले आहे. 

शनिवारी (दि.4) पुन्हा एकाच दिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार, अमेरिकेतून आलेला एक आणि पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा समावेश होता.

या मध्ये अपघातग्रस्त रिक्षाचालकावर  पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होती. त्याचे ऑपरेशन  करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.  दोन दिवसांपूर्वी त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या या रुग्णावर  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे 42 डॉक्टर आणि 50  कर्मचारी हे त्याच्या संपर्कात होते. त्यांना  रुग्णालयीन  प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता  खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवले आहे. यामुळे भीतीचे वातावरण, घबराट निर्माण झाली होती

दरम्यान, या सर्व  42 डॉक्टरचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्याचे  रिपोर्ट आता आले असून, हे सर्व डॉक्टर  निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.